Children's Day 2020: जाणून घ्या बालदिनाचा इतिहास

Childrens Day 2020: दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बाल दिवस साजरा करण्यात येतो. संपूर्ण देशभरात बाल दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असते. 

Children's Day
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर (14 November) रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो (Children's Day in India). बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.

...म्हणून १४ नोव्हेंबर रोजी बालदिवस 

संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ रोजी बालदिवस साजरा करण्याची घोषणा केली होती आणि भारतात सुद्धा २० नोव्हेंबर रोजीच बाल दिवस साजरा केला जात असे. मात्र, २७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुले फार प्रिय होती, त्यांचे मुलांवर खूपच प्रेम होते. यामुळे भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या म्हणजेच चाचा नेहरूंच्या जन्मदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) बालदिन साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या दिवशी बालदिन होतो साजरा

आंतरराष्ट्रीय बालदिन २० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. १९५९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बाल हक्कांची घोषणा सुद्धा करण्यात आली होती. बाल हक्क चार वेगवेगळ्या भागांत विभागले आहेत. यामध्ये जीवनाचा हक्क, संरक्षणाचा हक्क, सहभागाचा हक्क आणि विकासाचा हक्क यांचा समावेश आहे. असे बरेच देश आहेत जेथे २० नोव्हेंबर ऐवजी वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा करण्यात येतो.

अनेक देशांमध्ये १ जून रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. चीनमध्ये ४ एप्रिल रोजी, पाकिस्तानात १ जुलै रोजी, अमेरिकेत जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करण्यात येतो. याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये ३० ऑगस्ट रोजी, जापानमध्ये ५ मे रोजी, पश्चिम जर्मनीत २० सप्टेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो.

राज्यात यंदाचा बालदिवस कसा होणार साजरा?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ली ते १२वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी