Modak Recipe: घरीच बनवा सोप्या पद्धतीने मोदक, पाहा रेसिपी

लाइफफंडा
Updated Aug 20, 2020 | 14:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Modak Recipe in marathi: गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दोन दिवस बाकी आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवा घरच्या घरी

modak
Ganesh chaturthi:घरीच बनवा सोप्या पद्धतीने मोदक, पाहा रेसिपी 

थोडं पण कामाचं

  • सोशल डिन्स्टन्सिंगचे नियम पाळत यंदा गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
  • घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मोदक बनवू शकता. 
  • गणपती बाप्पालाही तुमचे घरी तयार केलेले मोदक नक्कीच आवडतील.

मुंबई: गणेश चतुर्थी(ganesh chaturthi) हा महाराष्ट्रातील मोठा सण. अवघ्या दोन दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. मात्र यंदा कोरोनामुळे(corona virus) हा तितक्या गाजावाजात साजरा केला जाणार नाही आहे. सोशल डिन्स्टन्सिंगचे(social distancing) नियम पाळत यंदा गणेशोत्सव(ganeshostav) साजरा केला जात आहे. गणपतीला प्रिय नैवेद्य म्हणजे मोदक(modak). तुम्ही जर मोदक बाहेरून मागवत असाल तर यंदा मात्र कोरोनामुळे बाहेरून खाद्य पदार्थ आणणे थोडेसे धोक्याचे आहे. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मोदक बनवू शकता. 

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

मोदक बनवण्यासाठी साहित्य

तांदळाचे पीठ(सुवासिक असल्यास उत्तम)
मीठ
गरम पाणी
नारळाचा चव
गूळ
वेलची
आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स

मोदकासाठीचे सारण

खवलेला नारळ आणि गूळ मिक्स करून ते कढईत चांगले परतून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण जास्त वेळ शिजवत ठेवू नये. नाहीतर गुळाला पाणी सुटते. त्यामुळे गूळ विरघळले की गॅस बंद करावा. यात वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण एका भांड्यात काढून ठेवावे.

मोदकाची पारी 

मोदकाची पारी बनवण्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा. त्यात थोडेसे तूप टाका. हे पाणी उकळण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यात मीठ टाका आणि हळू हळू पीठ टाका. पीठ नीट एकजीव करा. भांड्यावर थोडा वेळ झाकण ठेवून चांगली वाफ काढा. हे वाफवलेले पीठ परातीत घ्या. थोडे गरम असताना नीट एकजीव करून छान मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पारी बनवून घ्या. यात मोदकाचे सारण भरा. छोट्या छोट्या कळ्या बनवून मोदक वळून घ्या.

मोदक वाफवण्यासाठी चाळणीला तेल लावून घ्या. त्यात हळदीची पाने असल्यास ती ठेवा अन्यथा मलमलच्या कपड्यावर मोदक ठेवा. टोपावर चाळणी ठेवून मोदक छान १५ मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम सर्व्ह करा. गणपती बाप्पालाही तुमचे घरी तयार केलेले मोदक नक्कीच आवडतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी