Gandhi Jayanti 2020: जाणून घ्या महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल या रंजक गोष्टी

लाइफफंडा
Updated Oct 02, 2020 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

संपूर्ण विश्वाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची १५१वी जयंती साजरी केली जाणार आहे. दरवर्षी हा महत्वपूर्ण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Mahatma Gandhi birth anniversary
Gandhi Jayanti 2020: जाणून घ्या महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल या रंजक गोष्टी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • एक सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते गांधीजी
  • १३व्या वर्षी झाला कस्तुरबांशी विवाह, त्यावेळी शाळेत शिकत होते
  • इंग्लंडला जाऊन घेतले बॅरिस्टरीचे शिक्षण, अनेक देशांत केला प्रवास

नवी दिल्ली: संपूर्ण विश्वाला अहिंसेची (Non-violence) शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) १५१वी जयंती साजरी (birth anniversary) केली जाणार आहे. दरवर्षी हा महत्वपूर्ण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गांधी जयंतीच्या दिवशी लोक नवी दिल्ली (Delhi) येथील राजघाट (Rajghat) इथे त्यांना श्रद्धांजली (tribute) अर्पण करतात. शाळांमध्ये देशभक्ती (patriotism) आणि गांधीजींसंबंधी कार्यक्रम आयोजित केले जातात. सरकारी कार्यालयांमध्येही (government offices) अनेक सांस्कृतिक कार्यक्रम (cultural programs) होतात. गांधी जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल काही खास गोष्टी.

जन्म

महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई आणि वडिलांचे नाव करमचंद गांधी होते. त्यांचे मूळ नाव मोहनदास गांधी असे होते. ते विद्यार्थी म्हणून सामान्य होते, पण त्यांना अनेकदा बक्षिसे, पुरस्कार आणि शिष्यवृत्ती मिळत. गांधीजी अभ्यास आणि खेळ दोन्ही बाबतीत सामान्यच होते. आजारी वडिलांची सेवा करणे, घरच्या कामांमध्ये आईची मदत करणे आणि वेळ मिळाल्यास दूरवर एकटेच फिरायला जाणे त्यांना फार आवडत असे. गांधीजी १३ वर्षांचे असताना त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला. त्यावेळी ते शाळेत होते.

शिक्षण

१८८७मध्ये मोहनदास मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भावनगरच्या सामलदास महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यांना डॉक्टर व्हायचे होते, पण त्यांचा जन्म वैष्णव कुटुंबात झाला होता आणि त्यांना अशा पद्धतीचे काम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांना मनाविरुद्ध वेगळे क्षेत्र निवडावे लागले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टर होण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला गेले. त्यांचा हा प्रवास इंग्लंडपर्यंत मर्यादित राहिला नाही, त्यांनी अनेक देशांना भेट दिली.

आंदोलन

१९१४ मध्ये गांधीजी भारतात परतले. देशवासियांनी त्यांना महात्मा असे संबोधण्यास सुरुवात केली. गांधीजींनी पुढील चार वर्षे भारतात प्रचलित असलेल्या सामाजिक आणि राजकीय वाईट गोष्टी घालवण्यासाठी प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, दलित आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन अशी अनेक आंदोलने केली. त्यांनी आपले पहिले आंदोलन १९०६ साली ट्रान्सवाल एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्टविरोधात केले. यानंतर ते काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. २६ जानेवारी १९३० रोजी त्यांनी इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.

आहारपद्धती

महात्मा गांधींनी संपूर्ण जगासाठी एक आदर्श घालून दिला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाला अनुसरून त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचे व्रत पाळले. आयुष्याच्या एका काळासाठी त्यांनी चहा आणि कॉफीचाही त्याग केला होता. आहाराच्या बाबतीत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांना साखर वापरलेली आवडत नसे, पण फळे मात्र ते आवडीने खात. अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यांना आंबा प्रचंड आवडत असे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान

महात्मा गांधी हे भारताचे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महत्वाचे राजकीय आणि अध्यात्मिक नेते होते. त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने अत्याचारांविरुद्ध अहिंसक पद्धतीने लढा उभारला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देऊन त्यांनी देशभरातील लोकांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे नाव हे आज सत्य, शांती आणि अहिंसेचे प्रतिक आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २००७ साली गांधी जयंतीचा दिवस विश्व अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी