नवी दिल्ली : काल्पनिक प्रेम आणि वास्तविक जगात मोठा फरक असतो. एकमेकांना एकमेकांनी सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. हे प्रेम जपताना काही गोष्टी कटाक्षाने जपल्या पाहिजेत. ज्यामुळे तुमचं नातं अधिक खुलणार आहे. त्यामध्ये विश्वासाची साथ मिळणार आहे. सुखी आणि आनंदी जोडपं म्हणून तुम्हाला वावरायचं असेल तर तुम्ही तुमच्या नातेसंबंधाच्या अगदी सुरुवातीलाच काही सीमा निश्चित केल्या पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला नंतर निराश व्हावे लागणार नाही. जर तुम्हाला हे माहित नसेल की कुठून सुरुवात करावी, तर आम्ही तुम्हाला अशाच काही सीमांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या नात्याच्या सुरुवातीला पाळल्या पाहिजेत.
नातेसंबंधाच्या अगदी सुरुवातीला पैशाबद्दल बोलणे थोडे अवघड वाटू शकते, परंतु तसे करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पैशाच्या व्यवहाराबाबत चोख असाल तर तुम्ही त्याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं. जसं की तुम्ही वेळेत बिल भरत असाल, घरी मदतनीस येत असेल तर तिचे पगार देत असाल किंवा दर महिन्याचा खर्च यावर एकमेकांनी मोकळेपणाने बोलायला हवं. अगदी सुरूवातीच्या काळातच याबद्दल स्पष्टपणा महत्वाचा आहे.
तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल बोलले पाहिजे, पण जर याबाबत बोलण्यास त्याची हरकत नाही ना याची खात्री करुन घ्या. जर तुम्ही जोडीदाराला त्याच्या जुन्या नात्याबद्दल बरेच प्रश्न विचारले तर समोरच्या व्यक्तीला अवघडल्यासारखं होऊ शकतं. जर तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल बोलायचे नसेल, तर सुरुवातीला ही गोष्ट पार्टनरला क्लिअर करा.
रिलेशनशिपमध्ये कोणालाही वैयक्तिक वेळेची गरज असते. आणि हे अगदी महत्वाचं आहे. हेल्थी रिलेशनशिप हवे असेल तर दोघांनी एकमेकांचा आदर करावा. एकमेकांना मोकळीक द्यावी. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल बोलायचे नसेल तर तुमच्या जोडीदाराला त्याबद्दल सांगा आणि सीमा निश्चित करा.
काम हा तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि तुमच्या जोडीदाराने तुमचे काम समजून घ्यावे अशी तुमची इच्छा आहे. या कारणास्तव, काम करताना, तुमच्या जोडीदाराला तुमच्या स्वप्नांबद्दल सांगा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाबद्दल आणि भविष्याबद्दल काय विचार करता याची जाणीव त्याला होईल. घरी असताना कामाविषयी बोलणं टाळा. घरून काम करत असताना काम आणि जोडीदार दोघांशी जुळवून घ्या.
बेडरूम ही तुमच्या नात्यातील अतिशय खासगी खोली. या खोलीत तुम्हा दोघांनाही सुरक्षित वाटणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी बेडरूममध्ये सुरक्षित वातावरणासोबतच सुरक्षित आणि अचूक शब्द वापरणे गरजेचे असते. अन्यथा आपल्या जोडीदाराला अवघडल्या सारखे वाटू शकते. शारीरिक संबंधांच्या बाबतीत प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे जोडीदाराशी यासंदर्भात मोकळेपणाने बोला. आपल्या जोडीदाराची गरज समजून घ्या.