Independence Day Speech in Marathi 2022 (स्वातंत्र्यदिनाचे मराठी भाषण) : नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लाल किल्ला येथे भव्य सोहळा होणार आहे. ठिकठिकाणी राष्ट्रभक्तीशी संबंधित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या अशा भारलेल्या वातावरणात सोशल मीडियावर भारतातील निवडक नेत्यांची भाषणे व्हायरल होत आहेत. यात भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे एक भाषण आहे. हे भाषण पंतप्रधान असताना वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट १९९८ रोजी लाल किल्ला येथे स्वातंत्र्यदिनी केले होते. हे भाषण करण्याच्या काही महिने आधी भारताने पाच यशस्वी अणुबॉम्ब चाचण्या केल्या होत्या. या पाच चाचण्यांमध्ये हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीचा पण समावेश होता. या चाचण्यांद्वारे भारत स्वसंरक्षणासाठी समर्थ आहे हा संदेश देशाने दिला होता. । तिरंगा
भारताने आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ११ आणि १३ मे १९९८ या दिवशी पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या. पोखरणमध्ये केलेल्या अणुचाचण्या हा काही एक दिवसाचा खेळ नव्हता. आपले वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ, सुरक्ष पथके यांच्या अनेक वर्षांच्या तपस्येचे ते फळ होते. २५ वर्षांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी या इमारतीचा पाया रचला. त्या पायावर आज इमारत उभी करण्याचे काम मी केले. मला माहिती आहे की मी निमित्तमात्र आहे. या कामगिरीचे सर्व श्रेय वैज्ञानिकांची कुशाग्र बुद्धि आणि जवानांची अतुलनीय मेहनत यांनाच आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणातून चीन आणि पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला. वाजपेयी भाषणात पुढे म्हणाले, मी पूर्ण खात्रीने ग्वाही देऊ शकतो की, जगातील कोणतीही ताकद आम्हाला स्वतःच निश्चित केलेल्या या मार्गावरून दूर करू शकत नाही. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा यासाठी आम्ही मोठ्यातले मोठे बलिदान देण्यासाठी सज्ज आहोत.
भाषणात वाजपेयी पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या शेजाऱ्यांसोबतचे संबंध सुधारू इच्छितो. आम्हाला माहिती आहे की युद्ध टाळण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे युद्ध होऊ न देणे. पाकिस्तान सोबत आम्ही सर्व विषयांवर चर्चेसाठी तयार आहोत. माझे असे मत आहे की, जगात कोणतीही अशी समस्या नाही जिचे उत्तर चर्चेतून मिळणार नाही. पाकिस्तान असो वा चीन आम्ही मित्रत्वाच्या नात्याने चर्चा करून तोडगा काढू इच्छितो. प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. सीमेपलिकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया या अघोषीत युद्धासमान आहेत. सरकार या घटनांची गंभीर दखल घेत आहे, असेही वाजपेयी म्हणाले होते.