Lahuji Salve Death Anniversary 17 February 1881 : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायण पेठ गावातील मांगवाड्यात एका मातंग कुटुंबात झाला. लहुजींचे वडील राघोजी यांनी एकदा वाघाशी युद्ध केले. नंतर तोच वाघ खांद्यावर टाकून पेशव्यांसमोर सादर केला. याआधी लहुजींच्या घरातील वीरांना शिवाजी महाराजांच्या सैन्यात पराक्रम गाजवला होता. साळवे कुटुंबातील अनेक वीरांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले होते. शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" या पदवीने गौरविले होते.
पुढे लहुजींनी इंग्रजांविरोधात लढण्यासाठी जहाल क्रांतिकारकांची फौज तयार करण्याचे काम सुरू केले. लहुजींच्या कार्याला पेशव्यांचा पाठिंबा होता. लहुजी यांनी १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात पुढे अनेक क्रांतिकारकांनी प्रशिक्षण घेतले. यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे पण होते.
इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. वासुदेव फडके यांना ७ नोव्हेंबर १८७९ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली.