Mental impact of lay off: नोकरी जाणं मानसिक आरोग्यासाठी घातक, टेन्शन घेण्याऐवजी करा ‘हे’ उपाय

कुठल्याही व्यक्तीसाठी नोकरी जाणे, हा मोठा मानसिक आघात ठरतो. नोकरी जाण्यामुळे व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. डिप्रेशन, अँग्झायटी, चिडचिड होणे, आत्मविश्वास निघून जाणे, पॅनिक अटॅक येणे अशी अनेक लक्षणे त्यामुळे दिसू शकतात.

Mental impact of lay off
नोकरी जाणं मानसिक आरोग्यासाठी घातक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नोकरी जाणे हा प्रत्येकासाठी असतो मोठा मानसिक धक्का
  • कुटुंबाची चिंता आणि भविष्यातील अंधार याची कल्पना केल्याने येतो प्रचंड तणाव
  • सोप्या उपायांनी दूर ठेवता येतात नकारात्मक परिणाम

Mental impact of lay off: गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या कंपन्यांमधून (Companies) मोठ्या प्रमाणावर नोकरकपात (Lay off) होत आहे. अमेझॉन, ट्विटर, मेटा यासारख्या बड्या कंपन्यांमधूनही हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे. मेटाने पहिल्या फेरीतच 11 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. तर अमेझॉननंदेखील आतापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. नोकरी जाणं हे प्रत्येकाच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करणारी घटना असते. कुटुंबाची जबाबदारी आणि भविष्याची चिंता या बाबी मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत असतात. त्यातून मोठे मानसिक विकार जडण्याची शक्यता असते. 

नोकरी जाण्याचे मानसिक परिणाम

वेगवेगळ्या मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही व्यक्तीसाठी नोकरी जाणे, हा मोठा मानसिक आघात ठरतो. नोकरी जाण्यामुळे व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. डिप्रेशन, अँग्झायटी, चिडचिड होणे, आत्मविश्वास निघून जाणे, पॅनिक अटॅक येणे, रात्री झोप न येणे, निद्रानाशाचा त्रास सुरू होणे, थकवा जाणवणे, पोटात दुखत राहणे, भूक न लागणे यासारखी अनेक लक्षणे दिसायला सुरुवात होते. या सर्वांमागे प्रमाणाबाहेर असणारा तणाव हेच कारण असल्याचं सांगितल जातं. तुमचीही नोकरी गेली असेल आणि तुम्हीही हा तणाव अनुभवत असाल, तर काही सोप्या उपायांनी त्यावर मात करू शकता. 

मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवा

तुमची नोकरी अचानक गेल्यामुळे तुम्ही तणावाखाली असाल, तर मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं, हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात काय सुरु आहे, याची नीट माहिती त्यांना द्या. तुमच्या चिंता आणि तुम्हाला असलेलं टेन्शन त्यांच्याशी व्यवस्थित आणि मोकळेपणाने शेअर करा. कुठलीही गोष्ट गुपित असल्यासारखी मनात लपवून ठेवू नका. लपवून ठेवलेली गोष्टच तुम्हाला सर्वाधिक त्रास देत राहते. या काळात जवळच्या व्यक्तींकडून मिळालेली सहानुभूती आणि धीर हा एखाद्या संजीवनीसारखाच ठरतो. त्याचप्रमाणे भविष्यातील आव्हानं पेलण्यासाठी तुम्हाला मानसिक पाठबळही त्यामुळे मिळतं. 

अधिक वाचा - टॅनिंगमुळे आलेला पायांचा काळेपणा दूर करणारे 5 उपाय

मेडिटेशन आणि व्यायाम

नोकरी गेल्यानंतर तणावाच्या स्थितीत असताना मेडिटेशन फारच उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे प्राणायामासारखे व्यायामदेखील फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे या काळात आपल्या आवडीचं संगीत ऐकणं हे एखाद्या थेरपीसारखं काम करतं. मेंटल हेल्थसोबत फिजिकल हेल्थकडेही तुम्ही या काळात अधिक लक्ष देणं गरजेचं असतं. धावणे, जॉगिंग करणे, स्विमिंग करणे यासारखे व्यायाम करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. या तणावाच्या काळात जंक फूड, फास्ट फूड, फ्रोजन फूड यासारख्या हानीकारक पदार्थांपासून लांब राहणं फायद्याचं ठरतं.

अधिक वाचा - Budget international Trips: या देशांत कार घेऊनही फिरायला जाऊ शकता, वाचेल विमानाचा खर्च

राहा पॉझिटिव्ह

या काळात पॉझिटिव्ह राहणं हे सर्वात आवश्यक असतं. जर तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत असतील, तर तुम्ही स्वतःलाच स्वतःची किंमत समजून सांगा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देतात. परिस्थिती कायमस्वरुपी एकसारखी राहत नाही, हे कायम ठेवा.

डिस्क्लेमर - मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठीच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न अथवा समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी