Savitribai Phule Death Anniversary Speech in marathi: आज 10 मार्च, आजच्या दिवशी आपण भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन साजरा करत आहोत. सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी आपण भाषण करणार आहोत..
आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिनिनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. काल आपण जागतिक महिला दिन साजरा केला. महिला आज वेगवेगळ्या ठिकाणी पुरुषांबरोबर काम करत आहेत. महिला गगन भरारी घेऊ लागल्या आहेत, हे शक्य झालं आहे फक्त आपल्या सावित्री बाई फुले यांच्या कामामुळे.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत. बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. महात्मा फुले यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यास सावित्रीबाई फुले यांनी मनापासून साथ दिली.
अशा या महान सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते तर आईचे नाव लक्ष्मी होते. सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पालकांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. गावचे पाटील असणाऱ्या नेवासे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर गेले.
त्यावेळच्या प्रथेप्रमाणे सावित्रीबाईचा बालविवाह झाला होता. वयाच्या 9 व्या वर्षी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावातील 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला होता.
सावित्रीबाई यांचा विवाह जेव्हा झाला होता. तेव्हा त्या आपल्यासोबत ख्रिस्ती मिशनऱ्या कडून भेटलेले पुस्तक सोबत घेऊन जोतिबांच्या घरी आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई शिक्षित झाल्यानंतर त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे ठरवले. 1
848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली. समाजाची होणारी टीका सहन करत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली. त्यानंतर हळूहळू 18 शाळा उघडल्या.
भिडे वाड्यात सुरू केलेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलीची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या. पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. मुली शाळेत येत असल्यातरी सावित्रीबाई फुले यांना समाजाच्या टीकेला समोरे जावे लागत होते.
सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत. तर काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत, त्यांनी अनेक संघर्ष करत शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला.
त्या काळामध्ये बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागत असायचे. तसेच त्यांना केशवपन करून कुरूप बनविले जात.
महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगावं लागणारा त्रास पाहून ज्योतिराव फुले यांनी विधवा स्त्रियांसाठी काही तरी मदत करण्याचं ठरवलं. दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले.
सामाजिक कार्यासाठी ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज संघटना सुरू केली होती. सत्यशोधकाच्या कार्यातही सावित्रीबाई फुले यांचा सहभाग असायचा. ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. या अशा बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले त्यांच्या अनुयायांसह सतत कार्यमग्न राहिल्या.
1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा उपाय योजला तेव्हा सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. अशा गंभीर परिस्थितीत त्या आजारी लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत होत्या. सावित्रीबाई स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा करीत राहिल्या. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.
ज्योतिरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले आणि महिलांना शिक्षण घेण्यास संधी मिळवून दिली. अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम! धन्यवाद!