Vinayak Damodar Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथीनिमित्त करा हे मराठी भाषण

Marathi speech on the death anniversary of Vinayak Damodar Savarkar : मित्रांनो, आज विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून या थोर स्वातंत्र्यवीराच्या कार्याविषयी मी 4 शब्द आपल्याला सांगणार आहे. आपण ते शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती.

Marathi speech on the death anniversary of Vinayak Damodar Savarkar
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथीनिमित्त करा हे मराठी भाषण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथीनिमित्त करा हे मराठी भाषण
 • भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, हिंदू तत्वज्ञ, मराठी भाषेसाठी भाषाशुद्धीचे काम करणारे तज्ज्ञ तसेच भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीच्या चळवणीचे प्रणेते, कवी, लेखक
 • सावरकरांना हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते तसेच सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे म्हणून ओळखले जाते

Marathi speech on the death anniversary of Vinayak Damodar Savarkar : मित्रांनो, आज विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून या थोर स्वातंत्र्यवीराच्या कार्याविषयी मी 4 शब्द आपल्याला सांगणार आहे. आपण ते शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. 

विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, हिंदू तत्वज्ञ, मराठी भाषेसाठी भाषाशुद्धीचे काम करणारे तज्ज्ञ तसेच भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीच्या चळवणीचे प्रणेते, कवी, लेखक, 1938च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे विनायक दामोदर सावरकर.

सावरकरांना हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते तसेच सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे म्हणून ओळखले जाते. त्यांनी 1938च्या मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा हिंदुत्व ही संकल्पना जाहीरपणे मांडली होती. सावरकर म्हणाले होते,

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥

अर्थात सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या भारत भूमीला जो आपली पितृभूमी अर्थात पूर्वजांची भूमी आणि पुण्यभूमी समजतो तो हिंदू; असे विनायक दामोदर सावरकर म्हणाले होते. 

Holi Festival Special Trains 2023: होळी सण विशेष गाड्या 2023

Holi 2023 : होलिका दहन कधी होणार आणि रंगांची होळी कधी खेळणार?

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूरमध्ये झाला. विनायक सावरकर 9 वर्षांचे होते त्यावेळी त्यांच्या आईचे निधन झाले. वडील दामोदर, वडीलबंधू बाबाराव आणि धाकटे बंधू नारायणराव यांच्यासोबत राहून सावरकर मोठे झाले. बाबाराव यांच्या पत्नी येसूवहिनी यांनी विनायक सावरकर यांचा सांभाळ केला. सावरकरांच्या वडिलांचे 1899च्या प्लेगमध्ये निधन झाले. 

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या . चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

सावरकरांनी 1901 मध्ये यमुनाबाई यांच्याशी लग्न केले. नंतर 1902 मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.  श्यामजी कृष्ण वर्मा यांनी दिलेली शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन उच्च शिक्षणासाठी ते 1906 मध्ये लंडनला रवाना झाले. 

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर या साथीदारांच्या मदतीने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. याच संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रुपांतर झाले. 

लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. या भाषांतराला सावरकरांनी मराठीत स्वतः प्रस्तावना लिहून काढली. या प्रस्तावनेत त्यांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना पाठ होती.

इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा इतिहास सावरकरांनी लिहून काढला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोह करणारे लिखाण केल्याचा आरोप ठेवून इंग्रजांनी बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. याचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरेने नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकमधील कारवाईसाठी शस्त्र पाठवण्याचे काम लंडनमधून सावरकरांनी केले होते, असा आरोप ठेवून इंग्रजांनी सावरकरांना लंडनमध्येच अटक केली. समुद्रमार्गे सावरकरांना भारतात आणत होते. बोट मॉर्सेलिस येथे असताना सावरकरांनी समुद्रात उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला होता. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची अर्थात 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांची अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रवानगी झाली. तिथे त्यांना खड्या बेडीत ठेवायला सुरुवात झाली. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर भारताला स्वतंत्र करण्याचेच ध्येय होते. 

तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे आणि खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

सुटकेनंतर रत्नागिरीत 13 वर्षे स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी समाजसुधारणा केल्या. जवळपास 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. 15 आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले. सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठेची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. 

सावरकरांनी 1937 पासून सुमारे सात वर्षे हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह धरला. 

सुमारे साठ वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी 1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यावर 1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग केला. अन्नत्याग केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले. 

अशा या थोर स्वातंत्र्यवीराला नमन करून मी माझे भाषण संपवतो.

विनायक दामोदर सावरकर : 

 1. जन्म : 28 मे 1883 भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
 2. मृत्यू : 26 फेब्रुवारी 1966 दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
 3. चळवळ : भारताचा स्वातंत्र्यलढा
 4. संघटना : अभिनव भारत आणि अखिल भारतीय हिंदू महासभा
 5. वडील : दामोदर विनायक सावरकर
 6. आई : राधाबाई दामोदर सावरकर
 7. पत्नी : यमुनाबाई विनायक सावरकर (माई)
 8. अपत्ये : प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी