Yashwantrao Chavhan Speech : यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त करा हे मराठी भाषण

Marathi Speech on Yashwantrao Chavhan, Yashwantrao Chavhan Jayanti Bhashan, Yashwantrao Chavhan Birth Anniversary Speech : सन्मानीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रीणींनो, आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती.

Marathi Speech on Yashwantrao Chavhan
यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त करा हे मराठी भाषण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त करा हे मराठी भाषण
 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री
 • यशवंतराव चव्हाण जयंती 12 मार्च 1913 आणि पुण्यतिथी 25 नोव्हेंबर 1984

Marathi Speech on Yashwantrao Chavhan, Yashwantrao Chavhan Jayanti Bhashan, Yashwantrao Chavhan Birth Anniversary Speech : सन्मानीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रीणींनो, आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. 

मराठी माणसाचे महाराष्ट्र राज्य व्हावे यासाठी सुरू असलेले आंदोलन यशस्वी झाले आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. यशवंतरावांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण होते. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी देवराष्ट्र येथे झाला. बालपणीच वडिलांचे मायेचे छत्र गमावलेल्या यशवंतरावांचा सांभाळ त्यांच्या आई विठाबाई यांनीच केला. विठाबाई यांनी त्यांच्या भावाच्या मदतीने लहानग्या यशवंतची काळजी घेतली, त्याला मोठे केले, शिकवले. विठाबाईंनी यशवंतला बालपणापासूच देशप्रेम आणि स्वावलंबनाचे धडे दिले. त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केले. याचे चांगले परिणाम झाले.

यशवंतराव लहानपणीच उत्तमोत्तम पुस्तकांचे वाचन करून सुसंस्कृत झाले. त्यांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर उत्तम पकड मिळवली. वडिलांच्या अभावी गरीबीत टिकाव धरून यशवंतराव शिकत मोठे होत गेले. बालपणी अशीही परिस्थिती आली ज्यावेळी यशवंतरावांना शाळेची फी देणे अशक्य झाले होते. पण त्या प परिस्थितीतून मार्ग काढत यशवंतरावांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना यशवंतराव महात्मा गांधी, नेहरू, मार्क्स आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारसरणीकडे आकर्षित झाले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि गांधी, नेहरू विचारसरणीचा स्वीकार केला तो कायमचाच.

यशवंतरावांनी 1946 मध्ये मुंबई प्रांताच्या विधीमंडळात प्रवेश केला. इथूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. मोरारजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतरावांनी मंत्री म्हणून काम सुरू केले. मग मुंबई या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी कल्याणकारी योजना राबवल्या. दूरदृष्टीने नियोजन करून महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या योजनांवर काम सुरू केले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दीड-पावणे दोन वर्षे त्यांनी काम केले पण त्या काळात या राज्याच्या जडणघडणीचा ठोस असा पाया त्यांनी घातला. एकाचवेळी शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर विकास कामांचा आणि नवीन संस्थात्मक उपक्रमांचा त्यांनी प्रारंभ केला.

चीनने भारतावर 1962 मध्ये आक्रमण केले आणि पंडित नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावले. पुढे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याचे सामर्थ्य वाढले. यशवंतरावांनी केलेल्या नियोजनाचा फायदा भारताला 1965 च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत झाला. भारताने पाकिस्तानचा पराभव केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या सैन्याने देशाच्या सीमेपलिकडे थेट लाहोरच्या वेशीपर्यंत धडक मारली. 

लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या दोन पंतप्रधानांसोबत केंद्रीय मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी उत्तम कामगिरी बजावली. दोन्ही पंतप्रधानांच्या काळात ते एक महत्त्वाचे मंत्री होते. राष्ट्रीय राजकारणात असतानाच यशवंतरावांचे 25 नोव्हेंबर 1984 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा ते 71 वर्षांचे होते. आयुष्यभर जनसेवा करणाऱ्या या व्यक्तीने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडघडणीत मोलाची भूमिका बजावली. एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.

शनिकृपेसाठी शनिवारी खा हे पदार्थ

या गावात कुंभकर्णासारखी कुठेही कितीही तास झोपतात माणसं

यशवंतराव चव्हाणांनी घेतलेले मोठे निर्णय

 1. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि पंचायत समिती अशी तीन पातळ्यांवर पंचायत राजची व्यवस्था सुरू केली 
 2. राज्याची पंचवार्षिक योजना
 3. कोयना आणि उजनी प्रकल्पांना चालना देणे
 4. 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना
 5. मराठवाडा विद्यापीठ (आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आणि कोल्हापूर विद्यापीठ (आताचे शिवाजी विद्यापीठ) स्थापना
 6. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत संकल्पनेच्या पातळीवर सहभाग
 7. राठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना
 8. नागपूर येथे दीक्षा भूमीवर डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय
 9. दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीची सुटी

यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा

 1. आपले नवे मुंबई राज्य (1957)
 2. ॠणानुबंध (ललित लेख) (1975)
 3. कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (1984) 
 4. भूमिका (1979)
 5. महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (1960)
 6. विदेश दर्शन
 7. सह्याद्रीचे वारे (1962) ‌- भाषण संग्रह
 8. युगांतर (1970) स्‍वातंत्र्यपूर्व आणि स्‍वातंत्र्योत्‍तर भारताच्या प्रश्‍नांची चर्चा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी