Mobile Inventor | आज पूर्ण जग डिजिटल झालं आहे. मोबाईल हा जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसात सर्वाधिक काळ व्यक्तीला सोबत करणारी गोष्ट ही मोबाईलच ठरत आहे. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यावर याचे विपरित परिणाम होत असून मोबाईलच्या निर्मात्यालाच चिंता सतावू लागली आहे. जगात पहिल्यांदा मोबाईलचा शोध लावणारे मार्टिन कूपर यांनी नुकतंच मोबाईलबाबत भाष्य केलं आहे.
ज्या व्यक्तीने स्वतःच मोबाईलचा शोध लावला, त्या व्यक्तीने मोबाईल फोन न वापरण्याचा किंवा कमीत कमी वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. मोबाईलमुळे आयुष्यातील वेळ वाया जात असून मोबाईल दूर ठेऊन काही क्षण स्वतःसाठी काढा, असं आवाहन मार्टिन कुपर यांनी केलं आहे.
मार्टिन कुपर यांनी 1973 साली पहिल्यांदा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन तयार केला होता. त्या मोबाईलचं वजन होतं 2 किलो. न्यूयॉर्कमधील एक रस्त्यावर उभं राहून मार्टिन यांनी त्या मोबाईलवरून कॉल केला होता आणि जगभरात एका नव्या क्रांतीची नोंद झाली होती. आपला हा शोध जगात एक नवी क्रांती घडवणार आहे, याची कदाचित त्यावेळी मार्टिन यांना कल्पनाही नव्हती. मात्र आता ते मोबाईलचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला देत आहेत. एका मुलाखतीत असा सल्ला देऊन त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकलं.
अधिक वाचा - वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेला योग्य वस्तू असल्यास होईल लाभ
एका टीव्ही शोमध्ये मार्टिन कूपर यांनी मोबाईलबाबतचं आपलं मत व्यक्त केलं. दररोज मी 24 तासांपैकी केवळ 5 टक्के वेळच मोबाईलसाठी खर्च करतो, असं ते म्हणाले. दिवसरात्र मोबाईलचा वापर करणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला. लोकांनी आपापला मोबाईल स्विच्ड ऑफ करून आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मोबाईलपेक्षा आयुष्य महत्त्वाचं आहे. मोबाईलच्या नादात आयुष्यातील बहुमोल वेळ लोक वाया घालवतात आणि जेव्हा ही बाब लक्षात येते, तेव्हा फार उशीर झालेला असतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
अधिक वाचा - How to Clean Utensils: जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' उपाय करा, धुतल्यानंतर दिसतील एकदम चकाचक
मार्टिन कूपर यांनी तयार केलेल्या पहिल्या फोनला 10 तास चार्जिंग करावं लागत असे. त्यानंतर हा मोबाईल फक्त 25 मिनिटं चालायचा. याची लांबी होती 10 इंच. आता पन्नास वर्षांनंंतर मात्र मोबाईलनं लोकांच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. वेळीच सावध होऊन प्रत्येकाने आयुष्य जगायला सुरुवात करा, असा कानमंत्र त्यांनी जगाला दिला आहे.