Mother’s Day 2022 Quotes and Messages: आईचे महत्त्व सांगणाऱ्या सुंदर विचारांनी आईला द्या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा

आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा देऊन तिचा दिवस खास करण्यासाठी थोरामोठ्यांचे सुंदर विचार, Quotes आणि Messages आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. या मेसेजच्या माध्यमातून आपण आपल्या आईला खूश करू शकता.

Happy Mother's Day
आईला द्या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आईचे महत्त्व सांगणाऱ्या सुंदर विचारांनी आईला द्या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा
  • ‘आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे. – साने गुरूजी
  • ‘आई एक उत्तम शिक्षिका असते. तीच आपले सर्वस्व घडविते.’ -बाबा आमटे

Happy Mother’s Day 2022: मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे 'जागतिक मातृदिन.' आईवर तसे आपण वर्षातील ३६५ दिवस प्रेम करत असतो पण ते प्रेम साजरे करण्याचा जगाने एक दिवस ठरवला आहे. गेल्या काही वर्षांपासून मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा केला जात आहे. आपल्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी गृहित धरतो आणि आईला तर अगदी हक्काने. त्यामुळे तिचं प्रेम, वात्सल्य, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. तोच हा दिवस म्हणजे मदर्स डे. आईला तिच्या मोबाईलवर एक छानसा मेसेज पाठवा. यासाठी आम्ही तुम्हांला मदत करू... 

आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मदर्स डे निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार...

‘आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे.
– साने गुरूजी

शांताबाई शेळके यांची एक छान कविता आहे. आई म्हणजे काय ते मुलानं सांगितलं आहे-

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही
– फ.मुं. शिंदे

‘आई एक उत्तम शिक्षिका असते. तीच आपले सर्वस्व घडविते.’
-बाबा आमटे

‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,
नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी – कवी यशवंत

‘आ’ म्हणजे आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे ‘आई’
– गीतकार शांताराम नांदगावकर

‘आई’ नावाच्या अमृतवेलीवर सदाबहार फुले फुलतात. आपल्याला लहानपण पुन्हा हवे असते. कारण आईच्या कुशीत झोपायला मिळते आणि आई आपल्या हाताने बालकाला अमृतमय घास भरवते. म्हणूनच पृथ्वीच्या पाठीवर शाश्वत टिकणारे प्रेमाचे आणि मायेचे एकमेव नाव म्हणजे ‘आई!’

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? – माधव ज्युलियन

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही – ग. दि. माडगूळकर

देव जगात सगळीकडे राहू शकत नाही म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली.

‘दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस!’
– ग. दि. माडगूळकरांनी

‘अरे खोप्यामधील खोपा
सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।’
-बहिणाबाई

‘ठेच कान्हूला लागली
यशोदेच्या डोळा पाणी
राम ठुमकत चाले
कौसल्येच्या गळा पाणी,
देव झाला तान्हुला ग
कुशीत तू घ्याया,
तिथे आहेस तू आई
जिथे आहे माया!!’

– मंगेश पाडगावकर

न ऋण जन्मदेचे फिटे – मोरोपंत

गरीब- श्रीमंत, साक्षर-निरक्षरतेसारख्या कोणत्याही चौकटीत ‘आई’ नावाची व्याख्या अडकत नाही. असा आशय मांडणारी कवी हेमराज बागूल यांची कविता उत्कटतेने म्हणते-

‘माय म्हणजे एक मोठी ऊब
पोराला कवटाळणारा तिचा फाटका पदर
अडवू शकतो जगातील कोणतीही हिमलाट!
माय पुस्तकी अनपढ असली तरी
ती असते अनुभवांची अधिष्ठाता
संस्कारांची कुलगुरू नि स्वयंभू मुक्त विद्यापीठही!’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी