'याने' तणाव कमी होईल, पंतप्रधान मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ 

लाइफफंडा
रोहित गोळे
Updated Mar 31, 2020 | 17:44 IST

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन दरम्यान लोकांना तंदुरुस्त राहण्याचे प्रोत्साहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी योगासनचा एक व्हिडिओ शेअर केला.

prime minister modi shared video of yogasan said this helps in reducing stress
'याने' तणाव कमी होईल, पंतप्रधान मोदींनी शेअर केला खास व्हिडिओ   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यादरम्यान, लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी  प्रोत्साहन देत असल्याचं दिसत आहे. कारण मोदींनी आज (मंगळवार) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन योगासनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी ते असं म्हणाले की, 'याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहतं.' 

मोदींनी 'योग निद्रे'चा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते असं म्हणतात की, 'जेव्हा-जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा-तेव्हा मी आठवड्यातून १-२ वेळा योग निद्रेचा अभ्यास अवश्य करतो. याने शरीर निरोगी राहतं आणि मन प्रसन्न होतं, तसंच हे तणाव आणि चिंता देखील कमी करतं.' पंतप्रधान पुढे असंही म्हणाले की, 'इंटरनेटवर तुम्हाला योग निद्राचे अनेक व्हिडिओ सापडतील. इंग्रजी आणि हिंदीमध्ये १-१ व्हिडिओ शेअर करत आहे.'

विशेष म्हणजे रविवारी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात एका श्रोत्याने पंतप्रधानांना देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान काय करीत आहेत आणि त्यांच्या तंदुरुस्तीची काळजी कशी घ्यावी, असा प्रश्न विचारला होता. यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं होतं की, आपण काही फिटनेस तज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञ नाही. परंतु योगाचा अभ्यास हा अनेक वर्षांपासून त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचं ते म्हणाले होते. 'काही योगासनांनी मला खूप फायदा झाला. लॉकडाऊन दरम्यान आपल्याला देखील याची मदत होईल.' असं मोदी म्हणाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी