Ramabai Ambedkar Punyatithi । मुंबई : महाराष्ट्रात अनेक थोर पुरूष, विचारवंत होऊन गेले सर्वच जणांनी आपल्या कार्याने आणि खडतर प्रवासामुळे आपल्या मागील पिढीला प्रेरणा दिली. असाच एक धाडसी आणि खडतर प्रवास म्हणजे रमाबाई भीमराव आंबेडकर. चित्रपट असो की म गाणी किंवा नाटक प्रत्येक पडद्यावर रमाबाई आपल्याला दुःखात बुडालेली, सोशिक आणि रडणारीच दिसली. लहानग्यांपासून थोरा-मोठ्यांना रमाबाईचा हा खडतर प्रवास प्रेरणादायी आहे. पण खऱ्या अर्थाने रमाबाई ही रडणारी नाही तर लढणारी होती. प्रियंका उबाळेने 'रमाई' या चित्रपटातून रमाबाईंचा खडतर प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (Ramabai Ambedkar's film 'Ramai' has come to the forefront of the world).
अधिक वाचा : अखेर संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार
दरम्यान, या धाडसी प्रवृत्तीच्या रमाबाईच्या विचारांना एका चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बनवणाऱ्या प्रियंका उबाळेने अगदी मोजक्याच शब्दात रमाबाईंची जीवनगाथा सांगितली आहे. "माझ्या मनातील रमाई मला जगासमोर आणायची आहे. लहानपणापासून ते माझे शिक्षण होईपर्यंत एकच गोष्ट मला कळली ती म्हणजे 'रमाई'. माझी आई सांगते की मी लहानपणी साडी नेसून रमाईंसारखा डोक्यावर पदर घ्यायचे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी आणि रमाबाई आंबेडकर अर्थात देशातील कोट्यवधी लोकांच्या 'रमाई' यांच्यावर चित्रपट बनवणारी प्रियंका उबाळे हे सांगत होती. लक्षणीय बाब म्हणजे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय सर्वकाही प्रियंकानेच केले आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये तिने हा चित्रपट तयार केला आणि ती राज्याभरातील दलित वस्त्या, बौद्ध विहार या ठिकाणी हा चित्रपट प्रोजेक्टरवर दाखवते.
अधिक वाचा : आज सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार PM मोदी
रमाई या चित्रपटाची निर्माती प्रियंका उबाळे हिचे पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात झाले. नाट्यशास्त्राच्या अभ्यासाचा भाग म्हणून देखील तिने कित्येक वेळा रमाईंची भूमिका साकारली होती. हीच भूमिका मोठ्या पडद्यावर आली तर रमाईंचा खरा इतिहास तर नवीन पिढीसमोरही येईल असे तिला वाटू लागले आणि याच उद्देशाने अतिशय कठिण परिस्थितीतून तिने या चित्रपटाची निर्मिती केली.
चित्रपट तयार करायचा तर होताच पण त्यावेळी प्रियंकाच्या समोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला होता. पोस्ट प्रोडक्शन कसे करायचे, प्रमोशन आणि रिलीज याचे काय होणार असे नाना प्रकारचे प्रश्न तिला भिडसावत होते. पण प्रियंकाने हळू-हळू पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आधी शूटींग पूर्ण करून पण पुढील मार्ग सापडेल असा विचार करत प्रियंकाने तिचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी प्रियंकाला तिच्या मित्र मंडळींनी भरघोस मदत देखील केली. तिला शूटींगच्या कॅमेऱ्यापासून ते छोट्या-मोठ्या गोष्टीतही मदत करण्यात आली.
आता चित्रपट तयार झाला होता मात्र दाखवायचा कुठे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. थिएटरचा तर प्रश्नच येत नव्हता. कोणी म्हणायचे यूट्यूवर टाक तर कोण म्हणायचे सोशल मीडियावर व्हायरल कर. पण यूट्यूबवर चित्रपट रिलीज करणे म्हणजे भविष्यात मग त्याला कुठे फिल्म फेस्टिवलला स्क्रिनिंग मिळत नाही या तांत्रिक मुद्द्यामुळे प्रियंकाने हा विचार सोडला. नंतर गावोगावी जाऊन हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रियंकाच्या या धाडसी प्रवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.