Lunar Eclipse 2022 : म्हणून लागतं चंद्र ग्रहण, जाणून या मागील शास्त्रीय कारण नासाचा खास व्हिडीओ

राहु नावाचा राक्षण चंद्र खातो म्हणून ग्रहण होतं अशी गोष्ट आपण ऐकलेली असेल. पूर्वी अशीच मान्यता असल्याने लोक घराबाहेर पडत नाहीत, अनेक प्रकारचे निर्बंध होते. ग्रहण म्हणजे फक्त सावल्यांचा परिणाम आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. उद्या खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण जरी भारतात दिसणार नाहिये. पण ग्रहण का लागतं, याचे नेमके कारण काय आहे, जाणून घेऊया ग्रहणामागील शास्त्रीय कारण.

Lunar Eclipse 2022
खग्रास चंद्रग्रहण २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ग्रहण म्हणजे फक्त सावल्यांचा परिणाम आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे.
  • उद्या खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण जरी भारतात दिसणार नाहिये.
  • पण ग्रहण का लागतं, याचे नेमके कारण काय आहे, जाणून घेऊया ग्रहणामागील शास्त्रीय कारण.

Lunar Eclipse 2022 : मुंबई : राहु नावाचा राक्षण चंद्र खातो म्हणून ग्रहण होतं अशी गोष्ट आपण ऐकलेली असेल. पूर्वी अशीच मान्यता असल्याने लोक घराबाहेर पडत नाहीत, अनेक प्रकारचे निर्बंध होते. गरोदर महिला शिवण काम करत नसत तसेच बाहेरही पडत नव्हत्या. पण ग्रहण म्हणजे फक्त सावल्यांचा परिणाम आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. उद्या खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण जरी भारतात दिसणार नाहिये. पण ग्रहण का लागतं, याचे नेमके कारण काय आहे, जाणून घेऊया ग्रहणामागील शास्त्रीय कारण. 

ग्रहणे हा सावल्यांचा परिणाम आहे. चंद्र पृथ्वीच्या सावलीत सापडला की चंद्रग्रहण होते. सूर्याकडून येणारा प्रकाश पृथ्वी अडवते, त्यामुळे पृथ्वीची विरुद्ध दिशेला अवकाशात सावली पडते. या सावलीत सापडायचे असेल तर चंद्र हा पृथ्वीच्या संदर्भात सूर्याच्या विरुद्ध बाजूला असला पाहिजे. याचाच अर्थ सूर्य आणि चंद्र यांच्या बरोबर मध्यभागी पृथ्वी असायला पाहिजे. या स्थितीला पौर्णिमा म्हणतात. म्हणजेच चंद्रग्रहणासाठी पौर्णिमा असणे ही आवश्यक अट आहे. पौर्णिमेशिवाय चंद्रग्रहण होऊच शकत नाही. अर्थात, प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण व्हायला पाहिजे, म्हणजे वर्षात १२ चंद्रग्रहणे व्हायला पाहिजेत. मग असे का होत नाही? असे झाले असते, जर पृथ्वी सूर्याभोवती ज्या कक्षापातळीत (Orbital Plane) फिरते, त्याच पातळीत चंद्र पृथ्वीभोवती फिरला असता. चंद्र पृथ्वीभोवती ज्या कक्षेत फिरतो, ती कक्षापातळी पृथ्वीच्या सूर्यभ्रमण कक्षेच्या पातळीशी सुमारे ५ अंशाचा कोन करते. त्यामुळे काही पौर्णिमांना चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या उत्तरेला, तर काही पौर्णिमांना चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या दक्षिणेला असतो. अर्थात, अशा स्थितीत तो पृथ्वीच्या सावलीच्या कक्षेत येत नाही.

खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या गडद सावलीत आल्यामुळे चंद्र खरं तर गडप व्हायला हवा. निदान काळा दिसायला हवा, परंतु तसे होत नाही. पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वी भोवतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतात, त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो. मुख्यत: वातावरणातील बदलांमुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही, हे सहजी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो. असे १९ मार्च १८४८ रोजी झालेल्या चंद्रग्रहणात घडले होते.  या उलट १० जून १८१६ च्या चंद्रग्रहणात चंद्र जवळ जवळ गडपच झाला होता.

ग्रहण होण्यासाठी चंद्राच्या पातबिंदूपासूनच्या अंतराची मर्यादा कमी असल्यामुळे चंद्रग्रहणांची संख्या सूर्यग्रहणाच्या तुलनेत कमी असते. एका वर्षात दोन्ही मिळून जास्तीत जास्त ७ ग्रहणे होतात. त्यात चंद्रग्रहणांची संख्या २ किंवा ३ असू शकते.  १९३५ साली सूर्यग्रहणांची संख्या ५ तर चंद्रग्रहणे २ झाली.  तर ३ चंद्रग्रहणे आणि ४ सूर्यग्रहणे असे १९८२ साली झाले होते.

खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १ तास ४२ मिनिटे असतो.  स्पर्शापासून मोक्षापर्यंत जास्तीत जास्त ३ तास ४८ मिनिटे एवढा काळ जाऊ शकतो.  चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे, चंद्रग्रहणात चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश (स्पर्श) चंद्रबिंबाच्या पूर्व बाजूकडून होतो अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो. लागोपाठच्या अमावास्येला सूर्यग्रहण होऊ शकते, परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही.

मुख्य संदर्भ : मराठी विश्वकोश 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी