त्वचारोगाचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले, जाणून घ्या काय काळजी घ्यावी

लाइफफंडा
Updated Dec 20, 2019 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी त्वचाविकारांमध्ये आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. नायटा, खरूज, त्वचेवर पुरळ येणे, गजकर्ण, त्वचेवर फोड येणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.

त्वचारोगाचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले, जाणून घ्या काय काळजी घ्यावी
Skin disease increases by 9 percent medicines are not working  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी त्वचाविकारांमध्ये आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • हे विकार केवळ मोठ्यांनाच नाही तर लहानांमध्ये देखील आढळत आहेत.
  • या त्वचारोगांमध्ये औषधांना प्रतिरोध निर्माण झाल्याने औषधांच्या मात्रेचा रोगांवर काहीच परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई: सततच्या बदलत्या हवामानामुळे सर्गी, खोकला, ताप यासारखे आजार डोकं वर काढतात. हे आजार वाढत असतानाच मुंबईकर ग्रस्त आहेत ते त्वचारोगांमुळे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी त्वचाविकारांमध्ये आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. नायटा, खरूज, त्वचेवर पुरळ येणे, गजकर्ण, त्वचेवर फोड येणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. हे विकार केवळ मोठ्यांनाच नाही तर लहानांमध्ये देखील आढळत आहेत. याबाबत त्वचारोगासाठी औषधे घेऊनही सुधारणा होत नसल्याचे अनेक नागरिक सांगतात. या त्वचारोगांमध्ये औषधांना प्रतिरोध निर्माण झाल्याने औषधांच्या मात्रेचा रोगांवर काहीच परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सामान्य नागरिकाच्या मनात त्वचारोगाविषयी अनेक गैरसमज, अंधश्रद्धा, अज्ञान, संकोच, भीती असते. त्याविषयी उघडपणे बोलण्यास टाळाटाळ केली जाते. परिणामी उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्लाही घेतला जात नाही. त्यामुळे हे विकार आणखी बळावतात. मागील दोन वर्षांच नायटा झालेल्या रूग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पूर्वी केवळ वयोवृद्ध व्यक्ती त्वचारोगांवर उपचारासाठी येत असत, मात्र आता सर्व वयोटातील व्यक्तींमध्ये त्वचारोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्वाचारोग झाला की त्याची लागण दुसऱ्या सदस्यालाही होते. तेव्हा त्वचारोगाची लक्षणे समजताच तात्काळ उपचार घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षांपासून त्वचारोगांवरील औषधांचा प्रतिरोध वाढत आहे. आधी औषध, मलम लावल्यानंतर बरे होणारे हे आजार आता मात्र नियंत्रणात येण्यासाठी बराच काळ लागतो. तसेच यापूर्वी गजकर्ण, नायटा, संसर्गजन्य आजार हे नियंत्रणात होते. आता पूर्वी वापरल्या जाणाऱ्या या औषधांना हे आजार दाद देत नसल्याचेही त्वचारोगतज्ज्ञ सांगतात.

अनेकदा काहीजण घरगुती उपाय करतात. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच मेडिकलमध्ये तोंडी औषधे सांगून ती विकत घेतात. मात्र त्याचे विपरित परिणाम होऊन हे त्वचाविकार आणखी बळावतात. एरव्ही उन्हाळ्यात अधिक घाम आल्यास त्वचाविकारांचे प्रमाण वाढते. मात्र यावर्षी थंडीचे दिवस सुरू होताच हे आजार बळावत असल्याचे दिसत आहे. घामाचे प्रमाण कमी असूनही त्वचारोगाचे विषाणू पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय आजार नियंत्रणात येत नाही. त्यामुळे यावरील उपचारपद्धती पूर्ण करणे आवश्यक आहे. अंगावर चट्टे, खाज, पुरळ, त्वचेची लाहीलाही होणे, खाजवल्याने पुरळ फुटून पाणी येणे असा त्राल अनेकांना होत आहे. शरीराची त्वचा, डोक्यावरील त्वचेमध्ये संसर्ग वाढणे याला वैद्यकीय भाषेत ‘टिनिया’ म्हटले जाते.

त्वचाविकारांसंदर्भात घ्यावयाची काळजी-

त्वचारोग अंगावर काढू नये

तातडीने औषधे घ्यावी

प्रतिजैविकांचा कोर्स पूर्ण करावा

डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे स्वत: आणू नये

दिलेले औषध लागू झाले नाही तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...