दिल्लीतील ६०० रुपयांच्या 'स्पेशल गोल्ड पाना'वर पडल्या खवय्यांच्या उड्या, कसे बनते हे पान

लाइफफंडा
Updated Apr 12, 2021 | 18:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये पानाचे एक प्रसिद्ध दुकान आहे. हे दुकान एक अनोखे पान विकते. या पानाचे वैशिष्ट्य असे की हे शुद्ध सोन्यापासून बनते. आश्चर्य वाटले ना, मग पाहूया हे पान कसे बनते.

Special gold pan at Delhi Pan shop
दिल्लीतील खास शुद्ध सोन्याचे पान 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये पानाचे प्रसिद्ध दुकान
  • स्पेशल गोल्ड पान - राफाएलो गोल्ड पान
  • पानाची किंमत ६०० रुपये

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत पानाचे स्थान महत्त्वाचे आहे. पानाचा उल्लेख वेदांमध्येही सापडतो. भारताच्या सर्वच भाषांमध्ये पानासाठी वेगवेगळी नावे आहेत. याचाच अर्थ सर्वच प्रदेशांमध्ये पानाचे अस्तित्व वेगवेगळ्या रुपाने आहेच. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये पानाला ताम्बूल असे म्हणतात. मराठीत नागवेल, तेलगूमध्ये पक्कू, तामिळ आणि मल्याळममध्ये वेटिलाई आणि गुजराती भाषेत नागुरवेल असे म्हणतात.

कॅनॉट प्लेसमधील दुकान

दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील पानाचे एक दुकान खूप प्रसिद्ध आहे. खवय्यांची तिथे नेहमी गर्दी असते. या दुकानात चक्क स्पेशल गोल्ड पान मिळते. या पानात शुद्ध सोन्याचा वर्ख वापरला जातो. हे खास पान खवय्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

पारंपारिक महत्त्व

हिंदू धर्मातदेखील पानाचे महत्त्व मोठे आहे. पूजेसाठी सिंदूर, नैवेद्य, धूप आणि दिपासोबत नागवेलाच्या पानाचा वापर होतो. नागवेलाची पाने देवालादेखील चढवली जातात. पान फक्त सर्वात गुणकारी आणि केमिकल्सविरहित माऊथ फ्रेशनर नाही तर यामध्ये अनेक औषधी गुणसुद्धा असतात.

सर्वसाधारणपणे पारंपारिकरित्या पान एकाच प्रकारे बनवले जाते. मात्र जसे काळानुरूप विविध परंपरांचे मिश्रण होते तसेच पानाच्या बाबतीतदेखील झाले आहे. आता फक्त चूना, कत्था लावून पान तयार केले जात नाही. तर आपल्या नानाविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण पानाचे फ्लेवर चाखायला मिळतात.

देशातील ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच पानाची काही दुकानेदेखील प्रसिद्ध आहेत. ही दुकाने वेगवेगळ्या पारंपारिक आणि मॉडर्न चवीचे पान बनवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका निराळ्या पानाच्या दुकानाची आणि त्यातील एका खास पानाची माहिती देणार आहोत. 

दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील या प्रसिद्ध पानाच्या दुकानाचे नाव आहे, यामू की पंचायत. हे दुकान निरनिराळ्या चवीच्या पानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या दुकानातील सर्वाधिक वैशिष्टयपूर्ण पान आहे ते स्पेशल गोल्ड पान. शुद्ध सोन्याचे पान. शुद्ध सोन्याचे पान म्हटल्यावर तुम्ही दचकला असाल.

हे स्पेशल गोल्ड पान काय आहे


राफाएलो गोल्ड पान
पानाच्या या प्रसिद्ध दुकानाने अलीकडेच आपले इंस्टाग्राम खात्यातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक खास पान बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे. या खास पानाचे नाव  आहे, राफाएलो गोल्ड पान (raffaelo gold paan). हे विशेष पान शुद्ध सोन्यापासून बनवतात. या पानाची किंमत ६०० रुपये आहे. अर्थात ग्राहकानुसार पानाच्या रचनेप्रमाणे या स्पेशल गोल्ड पानाची किंमत वेगवेगळीदेखील असू शकते.

पानातील सामुग्री -
गोट चटणी
गुलकंद
खजूर
इलायची
देशी खोबरे
सुपारी
सोन्याचा वर्ख
चेरी
चॉकलेट
 
अशा सामुग्रीचा वापर करून हे पान बनवले जाते. हे पान थोडेसे महाग जरूर आहे मात्र याचा स्वाद एकदम निराळाच आहे. खवय्यांसाठी हे पान म्हणजे एक मेजवानी आहे. पानाच्या या प्रसिद्ध दुकानावर इतरही अनेक फ्लेवरचे पान मिळतात. त्यात स्विस चॉकलेट पान, फायन पान आणि किटकॅट पान हे काही प्रसिद्ध प्रकार आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी