Corona : 'ही' लक्षणे ज्येष्ठांमध्ये आढळल्यास वैद्यकीय तपासणी करुन घ्या!

लाइफफंडा
Updated Apr 24, 2020 | 08:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास, मधुमेह असे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. डॉक्टरांनी जाहीर केलेल्या लक्षणांपैकी एखादे आढळले तरी वैद्यकीय सल्ला घ्यावा....

senior citizen
कोरोना संकटात ज्येष्ठांनी काळजी घ्यावी  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • 'ही' लक्षणे आढळल्यास घ्या वैद्यकीय सल्ला
  • आधीपासून आजारी असलेल्या ज्येष्ठांनी घ्यावी जास्त काळजी
  • कोरोना झालेल्यांममध्ये ज्येष्ठांचा मृत्यू दर जास्त

नवी दिल्लीः कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा कोरोना हा आजार आधीपासूनच आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त प्राणघातक ठरत आहे. प्रामुख्याने हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास, मधुमेह असे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगत आहेत. भारतात डॉक्टरांनी विशिष्ट लक्षणे आढळल्यास ज्येष्ठ नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.

ज्या ज्येष्ठ नागरिकांना लवकर थकल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार दम लागणे, भूक न लागणे, तोल जाणे, विसरायला होणे, शरीर थरथरणे (कंप पावणे), ताप येणे, खोकला, घसा दुखणे (घशाला सूज येणे) यापैकी कोणतेही लक्षण अलिकडच्या  काळात वारंवार जाणवत असेल त्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा; असे डॉक्टरांनी सुचवले आहे. जी लक्षणे जाहीर केली आहेत ती आढळली याचा अर्थ कोरोना झाला असे नाही. काही जणांना वयोमानामुळे किंवा इतर त्रासामुळे ही लक्षणे आढळली असतील. पण कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता तरुणाईच्या तुलनेत कमी असते. आधीच एखाद्या गंभीर आजारासाठी औषध सुरू असेल तर कोरोना झाल्यास त्यांची प्रकृती आणखी ढासळते. ही बाब लक्षात  घेऊन ज्येष्ठ नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोना संकटाच्या  काळात ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. शक्यतो घरातच एका खोलीत राहून विश्रांती घ्यावी आणि घरातल्यांशी संवाद साधताना कायम नाक आणि तोंड स्वच्छ हातरुमालाने किंवा मास्क अथवा कापडाने झाकून घ्यावे. तब्येतीची काळजी घ्यावी. आधीपासूनच पथ्य, औषधे सुरू असल्यास त्यात हयगय करू नये, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.  

वेळ घालवण्यासाठी...

ज्येष्ठ नागरिकांनी वेळ घालवण्यासाठी छंद जोपासावे. वाचन, गाणी ऐकणे अशा उपक्रमांतून ज्येष्ठ नागरिक स्वतःचा वेळ घालवू शकतात. 

मृत्यूदरामुळे वाढली ज्येष्ठांविषयीची चिंता 

जगभर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ६० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचा मृत्यू दर जास्त आहे. ही बाब लक्षात ठेवून ज्येष्ठांनी काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी सांगितले.

जगात कोरोनाचे २७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण

जगात कोरोनाचे २७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. १ लाख ९० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त बरे झाले आहेत. अद्याप १७ लाख ८२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संकटावर मात करण्यासाठी औषध सापडलेले नाही. काही संस्थांकडून औषध सापडल्याचा दावा केला जात आहे. पण पुरेश्या चाचण्या झाल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल. जोपर्यंत औषधोपचार उपलब्ध होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टंस पाळणे, घरात बसून राहणे हेच कोरोना संकटापासून स्वतःला वाचवण्याचे पर्याय आहेत. तसेच तब्येत बिघडली तर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी