Happy Life: या बदलांमुळे आयुष्य होईल आनंदी, सुखी जीवनाचे 8 सोपे मंत्र

कितीही तणाव असला तरी काहीजण नेहमीच खूश आणि आनंदी असतात. प्रत्येकाला हे साध्य होऊ शकतं.

Happy Life
सुखी जीवनाचे 8 सोपे मंत्र  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आयुष्यात आनंदी राहण्याचे मार्ग
  • तणावाला ठेवता येईल कायमचं दूर
  • छंद आणि कृतज्ञतेमुळे सकारात्मक ऊर्जा

Happy Life : सध्याच्या व्यस्त आयुष्यात (Busy life) अनेकजण तणावाखाली (Tension) आपलं आयुष्य जगत असतात. कामाचा तणाव, नोकरी टिकवण्याचा तणाव, पैसे पुरण्याचा तणाव अशा कित्येक तणावांखाली जगताना त्यातून तात्पुरता दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. कधी मित्रांसोबत पार्टी करणं, कधी बाहेर फिरायला जाणं, कधी कुटुंबासोबत सहल काढणं यासारख्या उपायांनी तणावापासून तात्पुरता दिलासा मिळूही शकतो. मात्र शारीरिकदृष्ट्या तुम्ही दूर गेलात तरी मनात असणारा तणाव मात्र कायम असतो. अशा व्यक्ती सतत चिंताग्रस्त आणि दुःखी दिसतात. याउलट काही व्यक्ती मात्र कुठल्याही परिस्थितीत आनंदी असल्याचं आपण पाहतो. कितीही बिकट परिस्थिती समोर आली, तरी त्यांच्यावर येणारा तणाव ते सहजरित्या पेलतात आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढत आपलं आयुष्य आनंदी ट्रॅकवर (Happy Life) ठेवण्यात यशस्वी होतात. इंक डॉट कॉमनं यासाठी काही मूलभूत उपाय सांगितले आहेत, जे केल्यामुळे आयुष्य अधिक आनंदानं जगता येऊ शकतं. 

१. प्लॅन बी तयार ठेवा

आयुष्यात आपला प्रत्येक प्लॅन यशस्वी होईल, याची कधीच खात्री देता येत नाही. काही प्लॅन्स हे अयशस्वी होतात आणि त्यामुळे व्यक्तींना तणावाला सामोरं जावं लागतं. त्याऐवजी प्रत्येकवेळी जर दुसरा प्लॅनही तयार असेल, तर तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी असते. तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेचं प्रमाणही कमी होतं आणि तुम्ही आनंदी राहू शकता. 

२. यशाचा आनंद घ्या

लोक आपल्या यशाची तुलना नेहमी इतरांसोबत करत असतात. इतरांपेक्षा यशस्वी होण्यासाठी एकमेकांशी कुत्र्यामांजराप्रमाणे स्पर्धा करत असतात. मात्र जगात नेहमीच तुमच्यापेक्षा सक्षम आणि यशस्वी लोक असतातच. इतरांशी तुलना करून तुम्ही कधीच पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी स्वतःसोबत स्पर्धा करा आणि आपल्याला मिळालेल्या प्रत्येक यशाचं सेलिब्रेशन करायला शिका. 

अधिक वाचा - Vastu Shastra : तुमच्या घराचा मुख्य दरवाजा बरबादीच्या दिशेला तर उघडत नाही? वाचा वास्तूशास्त्रातील नियम

३. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा

आयुष्यात नेहमीच 100 टक्के आनंदी राहायला शिका. त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला मनाशी पक्क्या कराव्या लागतील. जे काम तुम्हाला आवडतं ते नक्की करा आणि जे आवडत नाही, ते करू नका. इतरांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिकणे, ही आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. 

४. समाधानी राहा

तुमच्याकडे असं काहीतरी नक्की असेल, जे इतरांकडे नसेल. त्याकडे पाहून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. काही लोक पैशांनी श्रीमंत असतात, काही मित्रांनी संपन्न असतात तर काहीजण चांगल्या तब्येतीमुळे आनंदी असतात. 

५. चांगली भाषा वापरा

चुकीची भाषा वापरणे, शिविगाळ करणे यामुळे तुम्ही आनंदी राहू शकत नाही. सर्व भाषांमधील नवनवे शब्द शिका, भाषेचं ज्ञान वाढवा. चांगलं बोलल्यामुळेदेखील आनंदाची अनुभूती होत असते. 

अधिक वाचा - Today in History Monday, 22nd August 2022: आज आहे प्रसिद्ध लेखक अनंतमूर्ती यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

६. कृतज्ञ राहा

आपल्या आयुष्यात येणाऱ्या आणि आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करणाऱ्या लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करायला शिका. तुमच्याकडे घरकाम करणारे नोकरचाकर असोत किंवा तुम्हाला मदत करणारं इतर कुणीही असो. प्रत्येकाप्रति कृतज्ञ राहा. 

७. इतरांना मदत करा

जेव्हा तुम्ही इतरांना निस्वार्थी भावनेनं मदत करता, तेव्हा मनात आपोआप सकारात्मक ऊर्जा तयार होते. 

८. छंद जोपासा

आयुष्यात नेहमीची कामं करताना छंद जोपासायला वेळ द्या. छंद जोपासल्यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्ही आनंदी राहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी