Cylinder saving tips: हिवाळ्यात स्वयंपाक करताना वापरा या टिप्स, गॅसची होईल बचत

शिळं अन्न गरम करण्यापासून अंघोळीचं पाणी तापवण्यापर्यंत अनेक कारणांसाठी लोक गॅस सुरु करत असतात. या कामांसाठी जास्त गॅसची गरज असते. शिवाय त्यामुळे गॅस सिलिंडर लवकर संपतो. थंडीच्या काळात गॅस इतर ऋतुंच्या मानाने लवकर संपत असल्याचा अनुभव आपल्याला नेहमीच येत असतो.

Cylinder saving tips
हिवाळ्यात गॅसची बचत करण्याच्या टिप्स  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात नेहमीपेक्षा लवकर संपतो गॅस सिलिंडर
  • सोप्या उपायांनी करता येते गॅसची बचत
  • दक्षता घेण्याने बचतही होईल आणि टळेल धोका

Cylinder saving tips: स्वयंपाकासाठी (Cooking) भारतातील बहुतांश लोक गॅसचा वापर करतात. स्वयंपाक करण्यासाठी इतर अनेक प्रगत साधनं बाजारात उपलब्ध झाली असली, तरी आजदेखील बहुतांश घरांमध्ये गॅसचाच उपयोग स्वयंपाकासाठी करण्यात येतो. चहा करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत अनेक कारणांसाठी गॅसचा उपयोग केला जातो. शिळं अन्न गरम करण्यापासून अंघोळीचं पाणी तापवण्यापर्यंत अनेक कारणांसाठी लोक गॅस सुरु करत असतात. या कामांसाठी जास्त गॅसची गरज असते. शिवाय त्यामुळे गॅस सिलिंडर लवकर संपतो. थंडीच्या काळात गॅस इतर ऋतुंच्या मानाने लवकर संपत असल्याचा अनुभव आपल्याला नेहमीच येत असतो. मात्र काही साध्या उपायांनी आपण गॅसची बचत करू शकतो. जाणून घेऊया, गॅसची बचत करण्याचे काही साधेसोपे उपाय. 

प्रेशर कुकरचा वापर

अनेकजण थंडीत कुकर घासावा लागू नये, यासाठी त्याचा वापर बंद करतात. मात्र प्रेशर कुकर वापरल्यामुळे गॅसची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते. त्यामुळे स्वयंपाकाचा वेळ तर वाचतोच, शिवाय गॅसचीही बचत होते. 

हलक्या भांड्यात स्वयंपाक

थंडीच्या काळात गॅसची बचत करण्यासाठी तुम्ही हलका तळ असणाऱ्या भांड्यांचा वापर करू शकता. अशी भांडी वजनदार भांड्यांच्या तुलनेत लवकर गरम होतात आणि या भांड्यात पदार्थही लवकर तयार होतो. त्यामुळे प्रत्येक स्वयंपाकावेळी तुमच्या गॅसमध्ये चांगलीच बचत होऊ शकते. 

अधिक वाचा - Black Friday Sales 2022: या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल, अमेझॉनवर 85 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

झाकणाचा वापर

उघड्या भांड्यात अन्नपदार्थ तयार करताना वाफ निघून जाते. त्यामुळे अन्न शिजण्यासाठी वेळ आणि गॅस दोन्ही जास्त लागतात. अशा वेळी भांड्यावर झाकण ठेवून स्वयंपाक केला, तर त्यामुळे गॅस आणि वेळ दोन्हीची बचत होऊ शकते. शिवाय झाकून ठेवल्यामुळे अन्न जास्त काळासाठी गरम राहू शकतं. 

ओली भांडी टाळा

काही लोक घाईगडबडीत ओली भांडीच स्वयंपाकासाठी वापरतात. त्यामुळे ही भांडी गरम होण्यासाठी जास्त वेळ लागतो. गॅसवर भांडं ठेवण्यापूर्वी ते कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावं. त्यामुळे भांडं लवकर गरम होईल आणि गॅसदेखील कमी खर्च होईल. 

अधिक वाचा - Vastu Tips:घराच्या बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका ही रोपे, नाहीतर भंग पावेल सुख-शांती

बर्नर तपासा

साधारणतः गॅस सुरु असताना निळ्या रंगाची ज्योत दिसते. हा बर्नर घाण झाला किंवा त्यावर काही इतर पदार्थ सांडले, तर ही लाल रंगाची ज्योत दिसू लागते. अशा वेळी बर्नर काढून तो गरम पाण्याने साफ करून घ्या. त्यामुळे गॅस बर्नरमध्ये अडकणं आणि वाया जाणं हा प्रकार बंद होईल आणि तुमचा सिलिंडर जास्त कालावधीसाठी तुम्हाला वापरता येऊ शकेल. शिवाय अन्नपदार्थ शिजवण्यापूर्वी गॅसची पाईप, बर्नर आणि रेग्युलेटर यापैकी कुठे गॅसची गळती तर होत नाही ना, याकडे बारकाईने लक्ष द्या. अनेकदा आपल्या नकळत गॅसची गळती झाल्यामुळे गॅस तर वाया जातोच, शिवाय त्यामुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता असते. 

डिस्क्लेमर - गॅसची बचत करण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी