पुणे : कोरोना विषाणुमुळे अधिकतर कार्यालयात वर्क फ्रॉम होम अजूनपर्यंत चालू आहे. लोकांनी घरांनाच कार्यालयाचं रूप दिलं आहे. कार्यालयासारखे वातावरण नसल्याने आपण तासनंतास सोफा किंवा खुर्चीवर बसून असतो. थोड्याही हलगर्जीपणाने आपल्याला गंभीर शारिरिक व मानसिक त्रास होऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या कामावरही होऊ शकतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होमच्या वेळी काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया.
वर्क फ्रॉम होम दरम्यान बहुतेकजण गादी किंवा सोफ्यावर लॅपटॉप ठेवून आरामात काम करतात. परंतु, हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. तसेच तुमच्या कामातही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे टेबल-खुर्चीचा वापर करणे उपयुक्त ठरते.
वर्क फ्रॉम होम वेळी काम करण्यासाठी जेथे कोणाचा अडथळा नसेल अशा एखाद्या शांत जागेची निवड करावी. यामुळे तुम्ही कामावर लक्ष केंद्रीत करू शकता. तुम्ही व्यक्तींसमोर काम केले तर, कामात चुका होऊ शकतात.
वर्क फ्रॉम होम दरम्यान पाठदुखी, मानदुखी, पाय दुखणे अशा समस्या उद्भवतात. कारण, आपण काम करण्यात इतके मग्न होतो की आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे, थोड्या कालावधीत शरिराची हालचाल करावी आणि आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.
घरून काम करताना काम सोपे करण्यासाठी तांत्रिक ज्ञान वाढवले पाहिजे. त्यासाठी विविध डिजिटल ऍप्सबद्दल अधिक माहिती घेतल्याने तुमचे काम सोपे होते. मेसेज किंवा कॉलवर आपले कर्मचारी किंवा वरिष्ठांचा मूड जाणून घेण्यासाठी नवीन कल्पनांचा विचार करावा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामाचं मूल्यमापन करता येईल.
कार्यालयाऐवजी घरात काम करताना बऱ्याच असुविधा होऊ शकतात. एकट्याने काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. तसेच कामासंबंधीत काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, टीम लीडरने सातत्याने आपल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून संवाद साधला पाहिजे. त्यांना काही अडचणी येत असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत.