Cooker Gasket : कुकर (Cooker) हा प्रत्येक स्वयंपाकघरातील (Kitchen) अविभाज्य घटक बनला आहे. वरण-भातापासून (Dal Rice) अनेक पदार्थ शिजवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो. कुकरमध्ये अनेक पदार्थ शिजवले जातात, मात्र सर्वसामान्य घरांत कुकरचा सर्वाधिक वापर केला जातो तो वरण आणि भात तयार करण्यासाठी. मात्र अनेकदा कुकरच्या झाकणाला (Loose Gasket) बसवलेलं रबर सैल होतं आणि कुकर लावणं त्रासदायक ठरायला सुरुवात होते. कुकरच्या शिट्या व्यवस्थित न होणं, भातात पाणी शिल्लक राहणं, भात फडफडीत होणं, कुकरमधील अन्न शिजण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागणं अशा अनेक समस्या यामुळे सतावू लागतात. काही सोप्या उपायांनी या समस्या दूर करता येतात आणि कुकर पूर्वीसारखाच उत्तमरित्या काम करायला सुरुवात होऊ शकते. जाणून घेऊया असेच काही साधेसोपे घरगुती उपाय.
कुकरची गास्केट सैल झाली असेल तर अगोदर ती थंड करा. त्यावर थंड पाणी ओतून गास्केट थंड होऊ शकते. त्याचप्रमाणं सरळ काही वेळ ती गास्केट फ्रीजमध्ये ठेवा. रबर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पुन्हा टाईट होतं आणि कुकरचं झाकण अगदी घट्ट बसायला सुरुवात होते. हा उपाय केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कुकर लावाल, तेव्हा प्रेशर तयार होईपर्यंत ते झाकण घट्ट पकडून ठेवा.
पिठाचा वापर करून सैल झालेल्या रबरावर तात्पुरता उपाय करता येऊ शकतो. त्यासाठी पीठ भिजवून ते रबरच्या सर्व बाजूंनी लावून घ्या. आता झाकण बंद करा आणि कुकर गॅसवर ठेवा. कुकरला प्रेशर येईपर्यंत झाकण घट्ट पकडून ठेवा.
कुकरच्या झाकणाचं रबर घट्ट कऱण्यासाठी सेलो टेपचाही वापर करता येऊ शकतो. सेलो टेप लावण्यामुळे रबर झाकणाला घट्ट चिकटून बसेल आणि कुकरमध्ये लगेचच प्रेशर तयार होईल. जेव्हा जेव्हा सेलो टेपचा चिकटपणा कमी होईल, तेव्हा नव्याने सेलो टेप लावा. काही काळ हा प्रयोग तुम्ही सुरू ठेवू शकता.
सर्व उपाय करूनही अनेकदा रबर सैलच राहिल्याचा अनुभव आपल्याला येतो. अशा वेळी सरळ सुईदोरा घेऊन रबर शिवणं आवश्यक असतं. रबर थोडंसं कापा आणि सुईदोऱ्यानं शिवून घ्या. यामुळे रबराचा अतिरिक्त आकार कमी होईल आणि ते झाकणाला घट्ट बसायला सुरुवात होईल. अधिक मजबूतीसाठी सुईदोऱ्याने शिवलेलं रबर सेलोटेपनं चिकटवून घ्या. त्यामुळे रबर अधिक काळ घट्ट राहायला मदत होईल.
अधिक वाचा - Toxic Relationship : तुमच्या नात्यातील ओलावा संपत चाललाय? ही 5 लक्षणं देतात कडवट संदेश
अनेकदा गॅसवर कुकर तिरका ठेवल्यामुळे रबर खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी नेहमी कुकर सरळ ठेवा आणि तो तिरका होणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे कुकर आणि त्याचं रबर दोन्ही दीर्घकाळ टिकतील.