Vastu Shastra : आपल्या घराचा मुख्य दरवाजा (Main Door) आणि आपली आर्थिक स्थिती (Financial Condition) यांचा फार जवळचा संबंध असल्याचं वास्तूशास्त्र (Vastu Shastra) मानतं. त्यामुळे कुठल्याही वास्तूशास्त्र तज्ज्ञाशी जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा पहिला प्रश्न ते घराच्या प्रवेशद्वाराविषयीच (Main entry) विचारतात. घराचा दरवाजा नेमका कुठल्या बाजूला आहे, याचं उत्तर सर्वप्रथम शोधलं जातं. कारण बहुतांश समस्या या चुकीच्या दिशेला दरवाजा असेल तर उद्भवण्याची शक्यता असते, असं वास्तूशास्त्रात मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना ज्या दिशेला तुमचं तोंड असतं, ती दरवाजाची दिशा मानली जाते. उदाहरणार्थ तुम्ही दरवाजातून बाहेर पडताना तुमचं तोंड उत्तरेला असेल, तर तुमचा दरवाजा उत्तर दिशेला आहे, असं समजलं जातं. घराच्या दरवाजाच्या दिशेचा व्यक्तीच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर बराच परिणाम होत असतो. त्या त्या दिशेशी संबंधित असलेले ग्रह जर तुम्हाला अनुकूल असतील, तरच त्या दिशेला प्रवेशद्वार असण्याचा तुम्हाला फायदा होतो. अन्यथा अनेक संकटं समोर उभी ठाकायला सुरुवात होते. जाणून घेऊया कुठल्या दिशेला दरवाजा असल्यावर काय होतं.
१. जर तुमच्या घराचा दरवाजा हा पूर्व दिशेला असेल, तो एक शुभ संकेत मानला जातो. मात्र जर तुमच्या कुंडतील मंगळ ग्रह गडबडला असेल तर मात्र या दिशेला दरवाजा असण्याचा कुठलाही विशेष फायदा तुम्हाला होऊ शकणार नाही, असं मानलं जातं. या परिस्थितीत कर्जबाजारीपणा वाढायला सुरुवात होण्याची शक्यता असते. एकेका पैशासाठी माणसाला संघर्ष करावा लागण्याची शक्यता निर्माण होते.
२.जर तुमच्या घराचा दरवाजा पश्चिमेला असेल, तर तो आर्थिक प्रगतीसाठी फारच शुभ मानला जातो. परंतु, जर कुंडलीमध्य बुध ग्रह ठिक नसेल, तर मात्र याचा फारसा फायदा त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला होत नाही. या घरात कधीच पैसा टिकत नसल्याचा अनुभव येतो. घरातील सगळी समृद्धी हळूहलू लयाला जात असल्याचाही अनुभव येतो.
३. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला असेल, तर तुमच्या आयुष्यात बराच संघर्ष करावा लागणार असल्याचं ते लक्षण मानलं जातं. मात्र जर कुंडलीत शनी आणि मंगळाची स्थिती अनुकूल असेल तर हाच दरवाजा तुमच्या कुटुंबात संपन्नता आणि समृद्धी आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असं वास्तूशास्त्रात मानलं जातं.
४. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा ईशान्य दिशेला असेल तर त्याची शुभ फळं मिळतात. मात्र तुमच्या कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती ठिक नसेल, तर मात्र हा दरवाजा बरीच आजारपणं घेऊन येत असतो.
अधिक वाचा - Shower during Thunderstorm : वीज कडाडताना अंघोळ करू नका, वाचा वैज्ञानिक कारण
५. जर तुमच्या घराचा दरवाजा वायव्य दिशेला असेल, तर तेदेखील शुभ लक्षणच असतं. मात्र तुमच्या कुंडलीत शनी ग्रहाची अवस्था चांगली नसेल तर चांगले मित्रदेखील तुमचे शत्रू होण्याची शक्यता असते. विशेषतः अशा परिस्थितीत शेजाऱ्यांशी भांडणं होण्याची शक्यता असते.
घराचं मुख्य प्रवेशद्वार साफ आणि प्रसन्न राहिल, याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्याचा सल्ला दिला जातो.