Loneliness explained: लहानपणी तर आपल्याला अनेक मित्र (Friends) होते. मात्र जसजसं वय वाढत गेलं तसतशी त्यांची संख्या कमी होत गेली, याचा अनुभव तुम्हालादेखील आला असेल ना? जगातील अनेकांना हा अनुभव येत आहे. शाळेत असताना अनेक मित्रांचा गराडा आपल्याभोवती असायचा, कॉलेजमध्येदेखील अनेकांच्या कोंडाळ्यात आपण वावरायचो. मात्र वय वाढल्यानंतर हे मित्र आणि इतर नातेवाईकदेखील आपल्यापासून मनाने दूर गेल्याचा भास अनेकांना होतो. या अवस्थेला एकटेपणा किंवा एकाकीपणा असं म्हणतात. इतरांकडून असणारी आपली अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा त्या व्यक्तींपासून किंवा गटांपासून आपण स्वतःला तोडून घेण्याची ही प्रक्रिया अशीच सुरु राहते. या प्रक्रियेलाच एकाकीपणा असं म्हणतात.
एकटेपणा म्हणजे एकटं राहणं नव्हे. अनेकांना गर्दीतही एकटेपणा वाटू शकतो. आजूबाजूला अनेक माणसं असतानादेखील या जगात आपलं कुणीही नाही आणि आपलं इतर कुणाशीही पटणं शक्य नाही, असं वाटणं याला एकटेपणा म्हणतात. काहीजणांना मात्र नैसर्गिकरित्याच एकटं राहायला आवडतं. अशा लोकांसाठी ही मानसिक समस्या नसते. मात्र जे लोक अपेक्षाभंग किंवा इतर कारणांनी स्वतःला समाजातील इतर घटकांपासून तोडून घेतात, तेव्हा तो एकटेपणाकडचा प्रवास सुरू होतो. त्यामागे अनेक मानसिक कारणं असल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
अधिक वाचा - How twins born: कशी जन्माला येतात जुळी मुलं? केरळच्या गावची गोष्ट वाचलीत का?
प्रत्येकाच्या त्याच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून काही ना काही अपेक्षा असतात. या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्याकडे तटस्थपणे न पाहता ती गोष्ट मनाला लावून घेतली जाते. ज्या व्यक्तीने आपला अपेक्षाभंग केला आहे, त्याच्याशी संबंध तोडण्याची इच्छा निर्माण होते आणि तशीच वर्तणूक होते. त्यामुळे एकामागून एक व्यक्ती दुरावत जाते आणि एकाकीपणा यायला सुुरुवात होते. विचार करण्याचा एक पॅटर्न तयार होतो आणि त्यानुसार व्यक्ती स्वतःला इतरांपासून तोडत जाते.
एकटेपणाची शिकार ठरलेल्या व्यक्ती इतरांच्या बदललेल्या वर्तणुकीचा विचार करत राहतात. आपण तिशीत असताना एखादी व्यक्ती जशी वागायची तशी ती चाळीशीत किंवा पन्नाशीत असताना का वागत नाही, असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र याच काळात स्वतःत झालेले बदल मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे या काळात परिस्थितीत झालेले बदलही त्यांच्या विचाराचा भाग नसतात. त्यामुळे थेट तुलना होऊन ते दुखावले जातात.
अधिक वाचा - Relationship Tips: मुलांच्या ‘या’ पाच गोष्टींवर फिदा होतात मुली, विज्ञानानेही दिला दुजोरा
व्यक्तीचं वय जसजसं वाढत जातं, तसतशी त्याची आदर मिळवण्याची भूकही वाढत जाते. इतरांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा आदर करावा, आपल्या चुकांमधून शिकावं असं त्यांना वाटत राहतं. त्यामुळे सतत आपले अनुभव सांगून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत असतात. मात्र अनेकांकडून त्यांना मान मिळत नाही. कधीकधी त्यांचा हिरमोडही केला जातो. त्यामुळे त्यांना एकटेपणाची भावना निर्माण होते. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका सर्वक्षणानुसार 60 टक्के वृद्ध व्यक्ती आपल्याला आदर मिळत नसल्याची तक्रार करत असल्याची नोंद करण्यात आली होती.