Mahavir Jayanti 2023 : यंदा 3 आणि 4 एप्रिल असे दोन दिवस का आहे महावीर जयंती?

Why Mahavir Jayanti is two days this year 3rd and 4th April 2023 : दरवर्षी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. यंदा हा दिवस सोमवारी असल्यामुळे या वर्षी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती आहे. पण...

Mahavir Jayanti
यंदा 3 आणि 4 एप्रिल असे दोन दिवस का आहे महावीर जयंती?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • यंदा 3 आणि 4 एप्रिल असे दोन दिवस का आहे महावीर जयंती?
  • चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती
  • लागोपाठचे दोन दिवस महावीर जयंती

Why Mahavir Jayanti is two days this year 3rd and 4th April 2023 : दरवर्षी चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. यंदा हा दिवस सोमवारी असल्यामुळे या वर्षी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती आहे. पण सरकारी पातळीवर आधी 4 एप्रिल हा दिवस महावीर जयंती म्हणून जाहीर करण्यात आला होता. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सरकारी यंत्रणेने महावीर जयंतीच्या दिवसात नंतर बदल केला. पण या प्रक्रियेत बराच वेळ निघून गेला होता. यामुळे यंदा काही ठिकाणी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी तर काही ठिकाणी मंगळवार 4 एप्रिल 2023 रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे. लागोपाठचे दोन दिवस महावीर जयंती साजरी होणार आहे. 

चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी ही तिथी सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी सुरू (तिथी उदय / तिथी आरंभ) होईल आणि मंगळवार 4 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी तिथी समाप्ती (तिथी अस्त) होईल.

शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर (जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर) यांचा जन्म दिवस हा महावीर जयंती उत्सव किंवा महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो. जैन धर्मियांच्या म्हणण्यानुसार भगवान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 अथवा इसवी सन पूर्व 615 मधील चैत्र मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी या तिथीला झाला. 

भगवान महावीर यांचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर 188 वर्षांनी म्हणजेच इसवी सन पूर्व 599 मध्ये भगवान महावीर यांचा जन्म झाला. भगवान महावीर यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला होता. पण 30 वर्षांचे झाल्यावर त्यांनी संन्यास घेतला. अध्यात्माची वाट धरली. 

वर्धमानाने तपश्चर्या केली. तब्बल 12 वर्ष कठोर तपस्या करून त्यांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवला.     निडर, सहनशील आणि अहिंसक झाले. याच कारणामुळे त्यांना भगवान महावीर या नावाने नागरिक ओळखू लागले. महावीर यांना 72व्या वर्षी पावापुरी येथे मोक्षप्राप्ती झाली. 

महावीर जयंती हा उत्सव साजरा करण्यासाठी जैन धर्मिय मिरवणूक काढतात. शोभायात्रा निघते. या शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या सोन्याच्या मूर्तीवर चांदीच्या कलशातून जलाभिषेक केला जातो. शोभायात्रेदरम्यान जैन धर्मगुरु नागरिकांना भगवान महावीर यांचा उपदेश नागरिकांना सांगतात. भगवान महावीर यांनी आखून दिलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करण्यास सांगतात. 

राजेशाही आयुष्याचा त्याग करून संन्यास घेणाऱ्या भगवान महावीर यांनी माणसांना अंधारातून प्रकाशाकडे नेले. भगवान महावीर यांनी केलेल्या उपदेशात पाच प्रमुख सिद्धांत आहेत. या सिद्धांतांना पंचशील सिद्धांत असेही म्हणतात. 

सत्य, अहिंसा, अस्तेय अर्थात चोरी न करणे, अपरिग्रह अर्थात भौतिक सुखांचा लोभ नसणे, ब्रह्मचर्य हे पंचशील सिद्धांत भगवान महावीर यांनी सांगितले. या पाच सिद्धांतांचे पालन केले तर मोक्षप्राप्ती होते असे भगवान महावीर सांगत. 

आजही भारतात अनेक ठिकाणी महावीर जयंती निमित्त मिरवणूक काढण्याची, शोभायात्रा काढण्याची पद्धत आहे. या निमित्ताने गरजूंना दान केले जाते. या दानात प्रामुख्याने अन्न, वस्त्र, पैसे (धन) यांचा समावेश असतो. अनेक ठिकाणी महावीर जयंती निमित्त मांस आणि दारूची दुकाने बंद ठेवली जातात. काही ठिकाणी सरकारी यंत्रणा स्थानिक पातळीवर मांस आणि दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश देते.

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी