यंदाच्या पाडव्याला ट्राय करा या हटके गोड पदार्थांच्या रेसिपी

लाइफफंडा
Updated Apr 05, 2019 | 12:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

आनंदाचा, चैतन्याचा सळसळता उत्साह म्हणजे गुढी पाडवा. हल्ली मुंबईत अनेक ठिकाणी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढल्या जातात. घरोघरी गोड पदार्थांची मेजवानी असते.

apple kheer
सफरचंदाची खीर  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : गुढी पाडव्याचा सण म्हणजे मराठी बांधवासाठी नव्या वर्षाची सुरूवात. इंग्रजी कॅलेंडरनुसार नव्या वर्षाची सुरूवात जरी एक जानेवारीपासून होत असली तरी मराठी नववर्षाची सुरूवात ही चैत्र महिन्यातील पाडव्याच्या सणापासून होते. या पाडव्याच्या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. आनंदाचा, चैतन्याचा सळसळता उत्साह म्हणजे गुढी पाडवा. हल्ली मुंबईत अनेक ठिकाणी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढल्या जातात. घरोघरी गोड पदार्थांची मेजवानी असते. पाडव्याच्या दिवशी हमखास केले जाणारे पदार्थ म्हणजे श्रीखंड पुरी, पुरणपोळी. मात्र यंदाच्या पाडव्याला तुम्ही काही हटके रेसिपीजही ट्राय करू शकता. 

गोड भात

आपण बासमती तांदळाचा वापर प्रामुख्याने बिर्याणी, पुलाव बनवण्यासाठी करतो. मात्र या बासमती तांदळाचा वापर करून तुम्ही गोड पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ चवीलाही उत्तम आणि भात प्रेमींसाठी तर हा चांगलाच ऑप्शन आहे. 

 

 

जाणून घ्या कसा करायचा हा पदार्थ
साहित्य - अर्धा कप बासमती तांदूळ, २ चमचे तूप, अर्धा इंच दालचिनी, २ लवंग, २ हिरव्या वेलच्या, पाऊण कप साखर, केशराच्या काड्या, पाव चमचा वेलची पावडर, बदाम, काजू, मनुका, पिस्ता, २ कप पाणी

कृती -

  1. बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. १५ मिनिटे तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे मोकळा भात शिजण्यास मदत होते. त्यानंतर पाणी गरम करून त्यात धुतलेले तांदूळ टाका. ९० टक्के भात शिजवून घ्या.
  2. भात पूर्णपणे शिजवून घेऊ नका. नाहीतर नंतर ढवळताना त्याचा लगदा होण्याची शक्यता असते. तांदूळ शिजण्यास ८ ते १० मिनिटे लागतात. तांदळातील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी चाळणीचा वापर करा. एका कढईमध्ये तूप टाका. त्यात दालचिनी, लवंग, वेलची टाका आणि ३० ते ४० सेकंदासाठी परतून घ्या. साखर आणि पाव कप पाणी टाका.
  3. यात केशर आणि वेलची पावडर टाका. जेव्हा साखर विरघळेल तेव्हा मिश्रण सतत हलवत रहा. यासाठी १-२ मिनिटे लागतील. साखर विरघळल्यानंतर मध्यम आचेवर चांगली आच येऊ दे. यात एक मिनिट तरी लागेल. जेव्हा मिश्रण उकळण्यास लागेल तेव्हा त्यात शिजलेला भात टाका.
  4. हलक्या हाताने भात मिक्स करा. यामुळे तांदळाचा प्रत्येक दाणा पिवळसर झाला पाहिजे. गॅस कमी करा आणि झाकण ठेवून भात भिजवून घ्या. भातातले सगळे पाणी कमी झाले पाहिजे.
  5. गॅस बंद करून भात सेट होण्यासाठी ठेवा. झाकण काढल्यावर यात चिरलेला सुकामेवा टाका. खाण्यासाठी तयार आहे गोड भात.

सफरचंदाची खीर

तांदळाची खीर, शेवयांची खीर, गव्हल्यांची खीर असे खिरीचे अनेक प्रकार तुम्ही चाखले असतील. मात्र सफरचंदाची खीर तुम्ही खाल्ली आहे का?. चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र खिरीच्या रुपाने सफरचंद खाल्ल्यास चवीलाही चांगले लागेल आणि आरोग्यासही चांगले. तर जाणून घ्या सफरचंदाची खीर कशी बनवतात ते

साहित्य - एक मोठे सफरचंद, साल काढून किसून घ्या, एक चमचा तूप, २ कप फुल फॅ दूध, तीन चमचे कंडेन्स्ड मिल्क, पाव टीस्पून वेलची पावडर, २ चमचे बदाम पातळ काप करून घ्या.

कृती -

  1. एका छोट्या कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घ्या. यात किसलेले सफरचंद टाका. सतत हे मिश्रण ढवळत राहा. जेव्हा सफरचंद शिजेल तेव्हा गॅस बंद करा. हे मिश्रण थंड होऊ द्या.
  2. एका दुसऱ्या कढईमध्ये दूध टाकून ते मध्यम आचेवर उकळू द्या. जेव्हा दूध उकळू लागेल तेव्हा गॅस कमी करा. दूध थोडेसे आटले पाहिजे. यासाठी ते सतत ढळवत राहा. ८ ते १० मिनटांनी दूध आटण्यास सुरूवात होईल त्यानंतर यात कन्डेस्ड मिल्क टाका.
  3. मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटांसाठी हे मिश्रण ढवळत राहा. यात कापलेले बदाम आणि वेलची पावडर टाका. नीट मिसळून घ्या. एक मिनिट शिजू द्या. गॅस बंद करा.
  4. हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर यात शिजलेले सफरचंद टाका. चांगले मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. थंड सफरचंदाची खीर खाण्यासाठी तयार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...