नवरात्रीत करा हलवा पुरीचा प्रसाद

Halwa Puri Recipe for Prasad Navratri Recipes जाणून घ्या हलवा पुरी तयार करण्याची पाककृती.

Halwa Puri Recipe for Prasad Navratri Recipes
हलवा पुरी 

थोडं पण कामाचं

 • नवरात्रीत करा हलवा पुरीचा प्रसाद
 • हलवा पुरी करण्याची कृती
 • काळ्या वाटाण्याची भाजी तयार करण्याची कृती

मुंबईः नवरात्र म्हणजे गोडाधोडाचा सण. प्रतिपदेपासून दसऱ्याच्या दिवसापर्यंत म्हणजे सलग दहा दिवस गोडाधोडाचे पदार्थ करण्याचा उत्सव. ज्या घरांमध्ये नवरात्र साजरी होते त्या घरांमध्ये तसेच जिथे नवरात्र साजरी होत नाही अशाही अनेक घरांमध्ये नवरात्रीच्या काळात गोड पदार्थ केले जातात. 

घटस्थापना होत असेल तर त्या घरांमध्ये देवीला प्रसाद दाखवण्यासाठी घरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे. काही घरांमध्ये गोड आणि तिखट अथवा मसालेदार असे किमान दोन चवींचे पदार्थ प्रसाद म्हणून तयार करण्याची पद्धत आहे. हल्ली दररोज घरी प्रसाद तयार करणे शक्य नसेल तर काही वेळा खरेदी करुन आणलेले पदार्थही प्रसाद म्हणून दाखवले जातात. पण अनेक घरांमध्ये आजही प्रसादासाठी थोड्या प्रमाणात का होईना पण पदार्थ घरी तयार करण्याची पद्धत आहे. 

यंदा कोरोना संकटात कोविड प्रोटोकॉलचे पालन करत नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या वर्षी शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना झाली. सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. अनेक घरांमध्ये दररोज प्रसादाचे पदार्थ तयार करायला सुरुवात झाली आहे. पण अनेक घरांमध्ये नवरात्र सुरू होताच प्रसाद म्हणून नवे पदार्थ परंपरागत पदार्थ किंचित नव्या पद्धतीने तयार करण्याची फर्माईश होते. नव्या पिढीतील अनेकांना त्यांच्या धावपळीच्या जीवनामुळे नेमके कोणते पदार्थ प्रसाद म्हणून करतात असा प्रश्न सतावतो. यावर उपाय म्हणजे खात्रीच्या ठिकाणावरुन माहिती घेणे...

प्रसादाच्या बाबतीत दररोज काय करायचे आणि कसे करायचे असते हा प्रश्न ज्यांना पडला आहे, अशा मंडळींच्या सोयीसाठी 'टाइम्स नाऊ मराठी' (timesnowmarathi.com) आज एका प्रसादाच्या पदार्थाची पाककृती अर्थात रेसिपी सांगणार आहे. 

आजचा पदार्थ - हलवा पुरी (Halwa Puri Recipe for Prasad Navratri Recipes)

हलवा तयार करण्यासाठी साहित्य - एक चमचा तूप, एक वाटी अथवा एक कप भाजलेला रवा, दोन वाट्या अथवा दोन कप पाणी, पाऊण वाटी अथवा पाऊण कप साखर (अथवा चवीनुसार), पाच तुकडे केलेले बदाम, ८ किसमीस, ५ काजू, पाव चमचा वेलची पावडर (वेलची पूड) अथवा वेलची

हलवा तयार करण्याची कृती - 

 1. पॅनमध्ये एक चमचा तूप टाका आणि गरम करा.
 2. तूप गरम झाल्यावर पॅनमध्ये भाजलेला रवा टाका आणि खरपूस भाजून घ्या, सतत ढवळत राहा. रवा भाजत असताना शेजारच्या शेगडीवर एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा. 
 3. पाण्याला उकळी आल्यावर त्यात साखर घाला. साखर पाण्यात विरघळल्यावर वरुन वेलची पावडर टाकून ढवळून घ्या. पाण्यात बदाम, किसमीस, काजू टाका आणि थोडे ढवळून घ्या. 
 4. पाणी पॅनमध्ये रव्यावर ओता आणि ढवळत राहा. हलवा छान तयार होईल.

पुरी तयार करण्यासाठी साहित्य - मैदा, एक किंवा दोन चमचे तेल, अर्धा चमचा मीठ, तळण्यासाठी तेल

पुरी तयार करण्याची कृती  -  

 1. मैदा एक किंवा दोन चमचे तेल आणि मीठ घालून व्यवस्थित कणीक मळून घ्या.
 2. थोडा वेळ कणीक ओल्या पांढऱ्या कापडाने झाकून ठेवा.
 3. कढईत तेल गरम करा. तेल तापल्यावर कणकेचे छोटे गोळे तयार करा आणि ते छोट्या पुऱ्यांच्या आकारात लाटून घेतल्यानंतर तळण्यासाठी कढईत टाका.
 4. कढईच्या आकारानुसार एकावेळी दोन किंवा चार वा सहा पुऱ्या एकदम तळता येतील. 

हलवा पुरी खाण्यासाठी रेडी आहे. काही जण काळ्या वाटाण्यांची भाजी तिखट म्हणून सोबतीला घेतात. आवडत असल्यास तसे करू शकता.

काळ्या वाटाण्याची भाजी तयार करण्यासाठी साहित्य - भिजवलेले काळे वाटाणे, कोथिंबीर, तेल एक किंवा दोन चमचे, २-३ हिरव्या मिरच्या, आले, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, एक चमचा धने पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, लाल तिखट पाव चमचा, पाव चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा मीठ चवीपुरते.

काळ्या वाटाण्याची भाजी तयार करण्याची कृती - 

 1. भिजवलेल्या काळ्या वाटाण्यांना कूकरमध्ये शिजवून घ्या. 
 2. कढईत तेल तापवा. तेल तापल्यावर त्यात जिरे घालून थोडा वेळ परतवून घ्या नंतर हिरव्या मिरच्या, आले, हळद, धने पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ क्रमाक्रमाने टाका. सतत ढवळत राहा.
 3. आता तेलात वरुन काळे वाटाणे टाका आणि सतत ढवळून व्यवस्थित शिजवून घ्या
 4. काळे वाटाणे शिजल्यावर गॅस बंद करा. वरुन काळ्या वाटाण्यांवर कोथिंबीर पेरुन सजवा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी