Control on Cholesterol | आपल्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन घटक असतात. त्यातील गुड कोलेस्ट्रॉलची आपल्या शरीराला गरज असते. मात्र बॅड कोलेस्ट्रॉलपासून शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलबाबत विचार करताना विशिष्ट पदार्थातून कुठल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल शरीरात जाणार आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. बॅड कोलेस्ट्रॉलमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसिज आणि ट्रिपल व्हेसल डिसिज यासारखे आजार होण्याचा धोका असतो. त्यासाठी दैनंदिन आहारात काही मूलभूत बदल केले, तरी बॅड कोलेस्ट्रॉलपासून आपली सुटका होऊ शकते. त्यासाठी काही पदार्थ खाणं सोडून दिलं पाहिजे.
अनेकांना असं वाटतं की बिस्किटांचा आणि कोलेस्ट्रॉलचा संबंधच नाही. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. बहुतांश बिस्किटं आणि कुकीजमध्ये ट्रान्स फॅट असतात ज्या शरीरासाठी सर्वाधिक घातक ठरतात. विशेषतः गोड आणि सॅच्युरेडेट बटर असणाऱ्या बिस्किटांमध्ये हा घटक सर्वाधिक असतो. त्यामुळे बिस्किटं खाण्याची सवय सोडा आणि आपल्या कुटुंबीयांनाही त्यापासून दूर राहायला सांगा.
तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांमुळे अन्न अनेक दिवस साठवून ठेवणं आणि आपल्या सोयीच्या वेळी ते खाणं शक्य झालं आहे. मात्र अशा अन्नातही मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट असतात. बाजारातून असे पदार्थ विकत घेताना त्यात असणाऱ्या ट्रान्स फॅटची पातळी तपासा. घरात गरमागरम अन्न शिजवून खाणे हीच उत्तम आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.
बाजारात मिळणाऱ्या बहुतांश केकच्या पाकिटांवर ‘झीरो ट्रान्स फॅट’ असं लिहिलेलं असतं. मात्र त्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्रत्यक्षात त्यात 0.5 ग्रॅम ट्रान्स फॅट असतात, असं तज्ज्ञ सांगतात. तुमच्या शरीरात तर 2 ग्रॅम ट्रान्स फॅट जात असतील, तर साखर खाल्ल्याइतका परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
आपल्याला फ्रेंच फ्राईज समोर आल्या की त्याला नकार देणं शक्यच होत नाही. अनेकांच्या आवडत्या फास्ट फूडपैकी फ्रेंच फ्राईज हा पदार्थ असतो. सध्या वेगवेगळ्या पदार्थांसोबत फ्रेंच फ्राईज हा प्रकार खायला दिला जातो. मात्र यात मोठ्या प्रमाणात हायड्रोजनेटेड फॅट्स असतात. याचा परिणाम शरीरावर होतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला त्यामुळे हातभार लागतो.
अर्थात, वर देण्यात आलेले सल्ले हे घरगुती उपाय आणि आरोग्य चांगलं राखण्याच्या संदर्भातील आहेत. तुम्हाला कोलेस्ट्रॉलसंबंधी काही गंभीर आजार असेल, तर डॉक्टरांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं असेल, तर तातडीने तुमच्या डॉक्टरांना संपर्क साधा आणि त्यावर डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी करा.