बॅरिअॅट्रिक सर्जरी करताय, मग आधी हे वाचा!

Bariatric Surgery लठ्ठ मंडळींसाठी बॅरिअॅट्रिक सर्जरी हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Bariatric Surgery
बॅरिअॅट्रिक सर्जरी करताय, मग आधी हे वाचा! 
थोडं पण कामाचं
  • बॅरिअॅट्रिक सर्जरी करताय, मग आधी हे वाचा!
  • वजन नियंत्रणात राहते
  • सर्जरी केली तरी आहाराची पथ्य पाळावी आणि व्यायाम करावा

मुंबईः फास्टफूड, जंकफूड यांचे वाढते सेवन आणि सततच्या बैठ्या कामांमुळे लठ्ठपणा ही एक समस्या झाली आहे. वाढत्या लठ्ठपणावर व्यायाम आणि डाएट हा उत्तम उपाय आहे. पण अनेकांना ते शक्य नसते. काही वेळा वजन खूप जास्त असते आणि लवकर आटोक्यात आणले नाही तर गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. काही वेळा तर निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी वजन लवकर आटोक्यात आणणे हाच उपाय असतो. अशा परिस्थितीत करायचा प्रभावी उपाय म्हणजे बॅरिअॅट्रिक सर्जरी. सोप्या शब्दात सांगायचे तर, वजन कमी करण्याचे ऑपरेशन. (Bariatric Surgery)

लठ्ठ मंडळींसाठी बॅरिअॅट्रिक सर्जरी हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहते. अनेक गंभीर आजारांपासून स्वतःला वाचवता येते. जर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारासारख्या एखाद्या गंभीर आजाराचा त्रास सतावत असेल तर अनेकदा अशा रुग्णांना बॅरिअॅट्रिक सर्जरीचा सल्ला दिला जातो. पण ही सर्जरी केली तरी संपूर्ण प्रभाव दिसण्यासाठी काही काळ जावा लागतो. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी सर्जरी करून घेण्यापूर्वी आणि नंतरही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

बॅरिअॅट्रिक सर्जरीत लॅप्रोस्कोपी तंत्राचा (दुर्बिणीचा) वापर केला जातो. जठर आणि लहान आतडं यांचा आकार मर्यादीत प्रमाणात कमी केला जातो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी स्लीव्हगॅस्ट्रोटोमॅमी आणि गॅस्ट्रिकबायपास करावी लागते. यानंतर आहारात आणि जीवनशैलीत बदल करावे लागतात. ऑपरेशन केल्यानंतर भूकेची तीव्रता कमी होते. शरीरात हार्मोनल बदल होतात. अतिरिक्त वजन कमी होण्यास यातूनच मोठी मदत मिळते. वजन कमी झाल्यास लठ्ठपणा आणि अनेक आजारांवर मात करणे शक्य होते. बॅरिअॅट्रिक सर्जरीने हृदयरोग, स्लीपअप्निया, टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि ब्रेनस्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सांध्यातील वेदना, संधीवात, पीसीओएस आणि लठ्ठपणाशी संबंधित अनेक कर्करोगांचा धोकाही कमी होतो, असे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले.

ओबेसिटी अँड मेटाबोलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडियानुसार, बॉडी मास इंडेक्सची मात्रा ३५ किलोपेक्षा जास्त असल्यास बॅरिअॅट्रिक सर्जरी करुन घ्यावी. तसेच बॉडी मास इंडेक्स ३० किलो आणि टाइप टू मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल यातील कोणताही आजार असलेल्यांनीही बॅरिअॅट्रिक सर्जरी करुन घेणे हिताचे आहे. पण या संदर्भातला अंतिम निर्णय वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा.

सर्जरी करण्याआधी तसेच केल्यानंतर पुढील काही दिवसांत आहारात करायच्या बदलांबाबत वैद्यकीय सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्जरी नंतर किमान एक-दोन आठवडे काही बंधने पाळावी लागतात. ती बंधने १०० टक्के पाळावी. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ आणि साखरेचे सेवन याबाबतचे निर्णय पूर्णपणे वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. सर्जरी संदर्भात संबंधित व्यक्ती आणि डॉक्टर यांच्यात मनमोकळा संवाद असणे वजन कमी करण्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सर्जरी नंतर आहाराची पथ्य आणि व्यायाम यासंदर्भात डॉक्टरांच्या सूचनांचे १०० टक्के पालन करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी