Turmeric Milk Benefits : हळदीचं दूध पिण्याचे पाच फायदे, अनेक आजार राहतील दूर

रोज रात्री हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायदे होतात. त्वचेच्या आरोग्यापासून ते कॅन्सरपर्यंत अनेक विकारांना दूर ठेवण्यासाठी हा उपाय नामी मानला जातो.

Turmeric Milk Benefits
हळदीचं दूध पिण्याचे पाच फायदे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायदे
  • त्वचेचं आरोग्य सुधारतं
  • झोपेचा दर्जाही सुधारतो

Turmeric Milk Benefits : हळद (Turmeric) आणि दूध (Milk) हे सर्वाधिक गुणकारी आणि पौष्टिक पदार्थ आहेत, हे आपण लहानपणापासून ऐकत आलेले असतो. पारंपरिकरित्या दूधाला पूर्णान्न मानण्यात आलं असून दूध पिण्यामुळे शरीराला सर्वाधिक फायदा होत (Health Benefits) असल्याचं सांगितलं जातं. दुधात वेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्त्वं असतात. त्याचप्रमाणं हळदीत अनेक औषधी गुण असातत. त्यामुळे हे दोन पदार्थ एकत्र करून त्यांचं सेवन केलं, तर आरोग्यावर त्याचे खूपच सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं सांगितलं जातं. वेगवेगळ्या अभ्यासानुसार हळदीत असणारे अँटिबायोटिक गुणधर्म आणि दुधातील कॅल्शिअममुळे शरीराची झीज भरून निघायला मदत तर होतेच, शिवाय अनेक आजार बरे होण्याचा वेग कमालीचा वाढतो. जाणून घेऊया रोज रात्री हळद आणि दूध पिण्याने नेमके कुठले फायदे होऊ शकतात. 

सांधेदुखी आणि सूज

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला सतत सांधे दुखण्याचा, आखडण्याचा त्रास असेल तर त्याला हळद घातलेलं दूध देण्यात यावं. त्यामुळं सांधेदुखी कमी व्हायला मदत तर होतेच, शिवाय शरीरावर येणारी सूज कमी होते. त्याचप्रमाणं वाढत्या वयानुसार सांध्यांशी संबंधित अनेक विकार आपोआपच दूर राहायला यामुळे मदत होते. 

त्वचेचं आरोग्य

हळद ही आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. पी हळद आणि हो गोरी ही म्हणदेखील हळदीच्या गुणधर्मातूनच तयार झालेली आहे. काही वर्षांपूर्वी त्वचेचे अनेक विकार कमी करण्यासाठी हळद हाच एकमेव उपाय असायचा. हळदीमुळे त्वचेचं आरोग्य तर सुधारतंच शिवाय वेगवेगळे विषाणू दूर व्हायला मदत होते. 

अधिक वाचा - Weight Loss Mistakes: वजन कमी करताना करू नका या ५ चुका, अन्यथा होईल पश्चाताप

कॅन्सरपासून संरक्षण

आतापर्यंत वेगवेगळ्या अभ्यासात दिसून आलं आहे की गंभीर आजारांपासून हळदीमुळे संरक्षण मिळायला मदत होते. हळदीत असणाऱ्या करक्यूमीन या घटकामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. विशेषतः हळदीत असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे फुफ्फुस आणि त्वचेशी संबंधित कॅन्सरपासून संरक्षण मिळायला सुरुवात होते. 

मेंदूचे आरोग्य

हळद घातलेलं दूध पिण्यामुळे आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारायला सुरुवात होते. नियमित हळदयुक्त दूध पिणाऱ्या व्यक्तींचा मेंदू हा अधिक आरोग्यपूर्ण आणि कार्यक्षम राहतो, असं सांगितलं जातं. मेंदूतील न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रोटिनची पातळी हळदीच्या दूधामुळे वाढते. त्यामुळे मेंदूचं आरोग्य सुरळीत राहायला मदत होते. 

अधिक वाचा - Rice for Weight Loss : मनसोक्त भात खा, फक्त शिजवण्याची पद्धत बदला! फटाफट कमी होईल वजन

चांगली झोप 

रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने झोपेचा दर्जा सुधारत असल्याचं दिसून येतं. हळदीत असणाऱ्या ॲमिनो ॲसिडमुळे अधिक गाढ झोप लागते. जास्त तणाव असणाऱ्या व्यक्तींना रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिण्याचा आवर्जून सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर - हळदीचं दूध पिण्याचे हे सामान्य फायदे आणि टिप्स आहेत. तुम्हाला आरोग्याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी