भारतात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या 'क्लिनिकल ट्रायल' सुरू

Bharat Biotech Starts Phase 3 Trials For COVAXIN भारत बायोटेक विकसित करत असलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू

Bharat Biotech Starts Phase 3 Trials For COVAXIN
भारतात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या 'क्लिनिकल ट्रायल' सुरू 

थोडं पण कामाचं

  • भारतात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या 'क्लिनिकल ट्रायल' सुरू
  • भारतात कोरोनाचे ४ लाख ४८ हजार ६४१ अॅक्टिव्ह रुग्ण
  • जगातील १ कोटी ५५ लाख १९ हजार ४४२ रुग्ण कोरोना अॅक्टिव्ह

नवी दिल्ली: आतापर्यंत जगात १३ लाख ३८ हजार ८७ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. भारत बायोटेक विकसित करत असलेल्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशीचे संशोधन प्रगतीपथावर आहे. (Bharat Biotech Starts Phase 3 Trials For COVAXIN)

कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्या आहेत. या टप्प्यासाठी आतापर्यंत २६ हजार स्वयंसेवकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस देण्यासाठी नियोजन केल्याची माहिती भारत बायोटेक या भारतीय कंपनीने दिली.

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (Bharat Biotech International Limited - BBIL), आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR), एनआयव्ही (National Institute of Virology - NIV) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे कोव्हॅक्सिन (Covaxin) विकसित करत आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्या आहेत. मुंबईत लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथे निवडक स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यासाठी नियोजन झाले आहे. भारत बायोटेक कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाकावाटे ड्रॉपच्या रुपात देण्यासाठी आणखी एक लस विकसित करत आहे. या लसचेही प्रयोग सुरू आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रयोगशाळा (Oxford University Lab), जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson), पुण्याची सीरम कंपनी (Serum Institute of India) आणि अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) संयुक्तपणे कोरोनावर मात करण्यासाठी कोविशील्ड (Covishield) लशीची निर्मिती करत आहेत. मुंबईतील केईएम आणि नायर या दोन हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवकांना कोविशील्डचे डोस दिले जात आहेत.

संशोधन प्रक्रियेचा भाग म्हणून कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या स्वदेशी लशींचे डोस मुंबईत निवडक स्वयंसेवकांना दिले जातील. भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.

जगातील ५ कोटी ५६ लाख ७७ हजार ९४३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ३ कोटी ८८ लाख २० हजार ४१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्याप जगातील १ कोटी ५५ लाख १९ हजार ४४२ रुग्ण कोरोना अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांना बरे करण्यासाठी तसेच कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भारतासह जगभर कोरोनावर मात करणाऱ्या लशींचे संशोधन सुरू आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने लेट स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधाराने त्यांची लस ९४.५ टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. तसेच अमेरिकेतील फायझर कंपनीने त्यांची लस ९० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला.

भारतात कोरोनाचे ४ लाख ४८ हजार ६४१ रुग्ण

भारतात आतापर्यंत ८९ लाख १२ हजार ६७७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ४ लाख ४८ हजार ६४१ रुग्ण अद्याप कोरोना अॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर देखरेख केली जात आहे, आवश्यक ते उपचार त्यांना दिले जात आहेत. देशात कोरोनामुळे १ लाख ३१ हजार ३० जणांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे भारतातील कोरोना रुग्णांपैकी ८३ लाख ३३ हजार ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी