Cashew Health Benefits | काजू खाल्ल्यामुळे वजन वाढतं? कुणी सांगितलं? ऋजुता दिवेकर सांगतायत ढिगभर फायदे

काजू खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं, हा गैरसमज आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काजूच्या फायद्यांबाबत केलेली पोस्ट अनेकांचे डोळे उघडणारी आहे.

Health Benefits of Cashew
काजू खा, फिट राहा  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • काजूमध्ये कोलेस्टेरॉल असतं हा गैरसमज आहे
  • काजू खाल्ल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते
  • काजूबाबत गैरसमज पसरवण्यामागे बड्या कंपन्यांचा हात

Cashew Health Benefits | काजूविषयी सध्या अनेक समज-गैरसमज आहेत. काजू (Cashew) खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचं (Cholesterol) प्रमाणं वाढतं, असा समज सध्या सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या आहारातील (Diet) काजूचं प्रमाण कमी केलं आहे. मात्र काजूबाबत पसरत असलेला हा गैरसमज काढून टाकण्याचा सल्ला प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी दिला आहे. काजूमध्ये कोलेस्टेरॉल तर नसतंच, शिवाय नियमित काजू खाल्ल्यामुळे आरोग्यावर किती चांगले परिणाम होतात, हेदेखील त्यांनी सांगितलं आहे.

उलटसुलट सल्ले

सध्या अनेक डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट काजूबाबत उलटसुलट सल्ले देताना दिसतात. त्यातील बहुतेकजण काजूपासून दूर राहण्याचाच सल्ला देतात. मात्र प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकर या नेहमीच पारंपारिक आहाराचं समर्थन करत असतात. आपले आजीआजोबा जे खात होते आणि जे इथल्या मातीत पिकतं, ते सगळं आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं, असं त्या नेहमीच सांगत असतात. ऋतुजा दिवेकर या खाण्यापिण्याबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचा आणि जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच सोशल मीडियातून करत असतात. लोकांनी कोलेस्टेरॉलला घाबरून काजू खाणं बंद केल्याची दखल दिवेकर यांनी घेतली असून हा गैरसमज दूर करण्याचं आवाहन केलं आहे. जो गैरसमज पसरवला जात आहे, त्याच्या बरोबर उलटी गोष्ट सत्य असल्याचं त्या म्हणतात.

काजूत कोलेस्टेरॉल नसतंच…

काजूमध्ये शून्य कोलेस्टेरॉल असतं, असं ऋजुता दिवेकर यांनी म्हटलं आहे. फिट आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. मात्र सध्या अनेकजण बदाम आणि अक्रोड खातात आणि काजू खाण्याचं टाळतात, असं दिसून आलं आहे. हा गैरसमज ऋजुता दिवेकर यांनी दूर केला आहे. त्या म्हणतात, काजूमध्ये बिलकूल कोलेस्टेरॉल नसतं. कुठलंही असत्य वारंवार सांगितलं गेलं तर ते सत्य आहे, असं वाटायला सुरुवात होते.  वास्तविक, काजूमध्ये शून्य टक्के कोलेस्टेरॉल असतं. शिवाय त्यात अनेक पोषण घटक असतात, ज्यामुळे चव आणि पोषण दोन्ही उद्देश साध्य होतात. 

काजूबाबत का पसरवले गेले गैरसमज?

मोठ्या ब्रँड्सच्या फायद्यासाठी अशा प्रकारचे गैरसमज पसरवले जात असल्याचं ऋजुता दिवेकर यांना वाटतं. आपल्या जमिनीत उगवणाऱ्या पिकांबाबत गैरसमज पसरल्यामुळे दोघांचंही नुकसान होतं. ज्यांना हे पदार्थ खाणं गरजेचं आहे, ते त्यापासून दूर राहतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचं नुकसान तर होतंच. शिवाय, ते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचंही त्यामुळे नुकसान होतं. जर आपल्या शेतात पिकणारे पदार्थ खाणं नागरिकांनी बंद केलं, तर त्याचं काय करायचं, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होतो. या परिस्थितीचा फायदा मोठ्या कंपन्या उचलतात आणि त्यांना हवे असणारे पदार्थ मार्केटमध्ये आणतात. 

काजूची महती ओळखा

काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. कोरोनरी हार्ट डिसिजची सुरुवात रोखण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी काजू गुणकारी ठरतो. हाडांसाठी आवश्यक असणारे अनेक मिनरल्स काजूमध्ये असतात. त्याशिवाय शरीराला ‘गुड फॅट्स’ देण्यात काजूचा हात कुणीच धरू शकत नाही. काजूबाबत पसरलेल्या गैरसमजामुळे अनेकांनी काजू करी खाणं सोडून दिलं आहे. मात्र, काजूबाबतचे गैरसमज दूर करा आणि मनापासून काजूचा आनंद लुटा, असा सल्ला ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी