Corona Vaccine: रशियाने कोरोना व्हायरसवर बनवली आणखी एक लस, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची घोषणा

Corona Vaccine: रशियाने कोरोनावर आणखी एक लस विकसित केल्याचा दावा केला आहे. या संदर्भातील माहिती स्वत: व्लादिमिर पुतीन यांनी दिली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात रशियाने कोरोनावरील पहिल्या लसीची नोंदणी केली होती.

Covid 19 Vaccine updates
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

Coronavirus Vaccine: जगभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण पहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसवर प्रभावी लस (Coronavirus Vaccine) विकसित करण्याचे काम जगभरातील विविध देशांत सुरू आहे. त्याच दरम्यान आता रशियाने कोरोनावरील दुसऱ्या लसीला मान्यता (Russia approved second coronavirus vaccine) दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी याची घोषणा केली आहे. व्लादिमिर पुतीन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सने चर्चा करताना सांगितले, "नोवोसिबिर्स्क वेक्टर सेंटरने आज कोरोना व्हायरसवर प्रभावी दुसऱ्या रशियन लसीची नोंदणी केली आहे."

व्लादिमिर पुतीन यांनी यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कोरोना व्हायरसवर स्पुटनिक व्ही या लसीची नोंदणी केली होती. या लसीच्या चाचणीचा शेवटचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाहीये. त्यानंतर आता रशियाने दुसऱ्या लसीचा दावा केला आहे. नवीन लस सिंथेटिक व्हायरस प्रोटिन्स वापरून रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढवते. तर स्पुटनिक व्ही अनुकूलित एडेनोव्हायरस स्ट्रेनचा वापर करते. 

रशियाचे उप-पंतप्रधान तातियाना गोलिकोवा यांनी व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत चर्चा करताना म्हटलं की, EpiVacCorona एपिवॅककोरोना लसीच्या नोंदणीनंतरच्या चाचण्यांसाठी रशियात सुमारे ४०,००० स्वयंसेवकांची भरती केली जाईल. तर कोरोना व्हायरसवरील लसीला डिसेंबरपर्यंत मान्यता मिळू शकते.

गेल्या काही आठवड्यांत रशियातील कोरोना संक्रमणात वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. बुधवारी रशियात १४,२३१ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तातियाना गोलिकोवा यांनी देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं आहे. तसेच इतर कोणत्याही उपाययोजनांची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव्ह यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं की, रशियाने रुग्णालयांतील ९० टक्के बेड्स राखीव ठेवले होते आणि हे सर्व बेड्स आता पूर्ण भरले आहेत.

मॉस्को हे शहर रशियातील कोरोना बाधित सर्वात प्रभावित शहर आहे. मॉस्कोमध्ये ६५ वर्षांहून अधिक नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी गेल्या आठवड्यात मॉस्कोमधील सर्व रहिवाशांना म्हटलं होतं की, कोरोनावरील लस वितरणासाठी उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी आपली रहदारी मर्यादित ठेवावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी