Ban on Coronil: मुंबई : योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचे कोरोना बरा करण्याचा दावा करणारे पतंजली (patanjali ) औषध कोरोनिल (Coronil) बाबत अजून क्लिनिकल ट्रायलबाबत अजून कोणतीही माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात या औषधावर बंदी असणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले.
बाबा रामदेव यांनी कोरोना बरा करणारे औषध बाजारात आणल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या औषधावर यापूर्वी राजस्थान सरकारने बंदी घातली होती. आता त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही बंदी घातली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, कोरोनिलची क्लिनिकल ट्रायल बाबत स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी असणार आहे.
यासंदर्भात एक ट्विट करताना अनिल देशमुख यांनी म्हटले की, @PypAyurved च्या 'कोरोनिल'ची नैदानिक चाचणी बद्दल जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तर्फे चौकशी होणार आहे. @yogrishiramdev यांना ताकीद की आयुर्वेदाच्या नावाने इतर राज्यांसारखी महाराष्ट्रात अवैध दुकानदारी खपवून घेतली जाणार नाही.
या संदर्भात राजस्थान सरकारने म्हटले की, कोविड-१९ महामारीच्या उपचारासाठी कोणत्याही औषधाची विक्री केली गेल्यावर विक्रेत्या विरूद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्रीय आयुष मंत्रालयाने रामदेव यांच्या औषधावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. तसेच बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला या कोरोनिलच्या जाहिरात करण्यास बंदी घातली आहे. तसेच पतंजलीकडे या औषधाची माहिती मागितली आहे.
आयुष मंत्रालयानंतर आता उत्तराखंड आयुर्वेद विभागाने पतंजलीच्या औषधांना चुकीचे म्हटले आहे. तसेच पतंजलीला नोटीसही पाठवली आहे. दरम्यान, पतंजलीने दावा केला की, आयुष मंत्रालयाने मागितलेली माहिती देण्यात आली आहे. बाबा रामदेव यांनी दावा आहे की कोरोना विरूद्ध प्रभावी ठरणारी कोरोनिलबाबत केलेला दावा योग्य आहे.