Corona vaccine: ऑक्सफर्डने कोरोना लसबाबत दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या सविस्तर 

Oxford coronavirus vaccine: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून विकसित करण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत एक महत्वाची आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ही लस वयोवृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते. 

Coronavirus vaccine
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठा (Oxford University)कडून विकसित करण्यात आलेली कोरोनावरील लस ही वयोवृद्धांसाठी खूपच महत्वाची ठरणार असल्याचं दिसत आहे. कारण, ही लस ५६-६९ या वयोगटातील तसेच ७० हून अधिक वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास महत्वाची कामगिरी करत आहे. या लसीच्या संदर्भातील ही माहिती गुरुवारी द लँसेट (The Lancet) या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. ही लस भारतातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियासोबत मिळून तयार करण्यात येत आहे.

अभ्यासात ५६० निरोगी प्रौढांचा समावेश करण्यात आला होता आणि त्यात असे समोर आले आहे की, 'ChAdOx1 nCoV-19'नावाची ही लस तरुणांच्या तुलनेत वयोवृद्ध नागरिकांसाठी खूपच महत्वाची आहे. ही लस वृद्ध वयोगटातील लोकांमध्ये कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.

संशोधकांनी नमूद केले आहे की, हा निष्कर्ष खूपच उत्साहजनक आहे कारण, वयोवृद्ध नागरिकांना कोरोना व्हायरसचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशी एखादी लस आवश्यक आहे जी वृद्ध नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनाशी लढण्यास मदत करेल.

ऑक्सफर्डची लसी विकसित करणाऱ्या समूहाशी संबंधित डॉक्टर माहेशी रामासामी यांनी वयोवृद्ध नागरिकांसाठी ही लस उपयोगी ठरत असल्याने आनंद व्यक्त केला आहे. ऑक्सफर्डच्या या लसीच्या १०० कोटी डोसची मागणी यापूर्वीच ब्रिटनने दिली आहे.

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटकडूनही कोरोनावरील या लस निर्मितीसाठी काम सुरू आहे. या लस निर्मितीच्या कामात सीरम इंस्टिट्यूट अॅस्ट्रोजेनकासोबत मिळून १०० मिलियन डोस तयार करणार आहे. भारतात ही लस कोविशील्ड नावाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस उत्पादक कंपनी लॉन्च करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी