'ई-संजीवनी'चा राज्यात ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

महाराष्ट्रात १३ एप्रिल २०२० रोजी सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी  (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

e sanjeevani opd
'ई-संजीवनी'चा राज्यात ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ 

थोडं पण कामाचं

  • 'ई-संजीवनी'चा राज्यात ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ
  • दररोज किमान ३०० रुग्ण 'ई-संजीवनी'द्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेतात
  • 'ई-संजीवनी' मोफत उपलब्ध आहे

मुंबईः महाराष्ट्रात १३ एप्रिल २०२० रोजी सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी  (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज किमान ३०० रुग्ण 'ई-संजीवनी'द्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ हजार ८९१ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेक कोरोना रुग्णांनी तसेच क्वारंटाइन असलेल्यांनीही या 'ई-संजीवनी'चा लाभ घेतला. e sanjeevani opd

कोरोना संकट सुरू झाल्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाले. या काळात रुग्णांना घरबसल्या वैद्य़कीय सेवेचा लाभ घेता यावा यासाठी ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी  (बाह्यरुग्ण) सेवा सुरू करण्यात आली. या सेवेची सुरुवात १३ एप्रिल २०२० रोजी झाली. या सेवेला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला. सुरूवातीला वेबसाइटवरुन ही सेवा घेण्याची सोय उपलब्ध होती त्यानंतर त्याचे मोबाईल ॲपही विकसीत करण्यात आले. यामुळे सेवेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली.

'ई-संजीवनी' मोफत आहे. या माध्यमातून सामान्य तसेच तज्ञ ओपिडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी 'ई-संजीवनी' अंतर्गत वेबसाइट आणि अॅप येथे आहे. दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी 'ई-संजीवनी' सेवेमार्फत रुग्णांना त्यांच्या आजारावर सल्ला देतात. दररोज सकाळी ९.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५.०० यावेळेत 'ई-संजीवनी' सुरू असते. रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि चॅटचा वापर करून घरबसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करता येते तसेच त्यांचा सल्ला घेता येतो. 

'ई-संजीवनी' सेवेमार्फत रुग्णांना सल्ला दिल्यानंतर एसएमएस द्वारे ई-प्रिस्क्रिप्शन रूग्णांना दिले जाते. ई-प्रिस्क्रिप्शनद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधे घेऊ शकतात.

वेबसाइट - https://esanjeevaniopd.in/

अॅप - https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी