Blood Sugar Control Tips | रक्तातील साखर अचानक वाढण्याचा अनुभव अनेकांना येतो. गेल्या काही वर्षांत भारतातील मधुमेहींचं प्रमाण वाढत असून बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढण्याचे प्रकार घडतात. अनेकदा रक्तातील साखर अचानक वाढते आणि अशा वेळी काय करावं हे समजत नाही. अशा प्रसंगी अनेकजण पॅनिक होतात आणि त्यामुळे अधिकच मानसिक तणाव निर्माण होतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे तणाव निर्माण झाल्यामुळे काही वेळा त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय असतात. ते लक्षात ठेवले तर अशा वेळी त्यांचा उपयोग करून समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. जाणून घेऊया असेच काही उपाय.
भरपूर पाणी पिणं हा रक्तातील साखर कमी करण्याचा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. भरपूर पाणी पिल्यावर तुमचं शरीर नॉर्मल व्हायला मदत होते. जास्त पाणी प्यायल्यामुळे रक्तात तरंगणारे अतिरिक्त घटक मूत्राद्वारे बाहेर पडतात आणि शरीराला आराम पडतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढल्याचा संशय जरी आला तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायला सुरुवात करा.
शरीर फिट राखण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे, हे आपल्याला माहित असतं. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेकजण व्यायाम सुरू करायचं ठरवतात मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लांबणीवर टाकत राहतात. या काळातच अनेकदा डायबेटिक्स त्यांना गाठतो आणि आयुष्यभर जोडीला जुंपला जातो. नियमित व्यायाम करणे हाच त्यावरचा एक उपाय आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
अधिक वाचा - Uric Acid : युरिक ॲसिड कमी करण्याचा ‘मसालेदार’ उपाय, गुडघेदुखीही होते गायब
कामाच्या विचित्र शेड्युलमुळे अनेकांच्या खाण्यापिण्याचं शेड्युलही चुकीच्या पद्धतीचं असतं. अनेकांच्या जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळा सातत्याने बदलत असतात. जर रक्तातील साखर वाढत असल्याचं तुमच्या लक्षात आलं, तर खाण्यापिण्याच्या सवयींवर फेरविचार करण्याची गरज आहे. त्या सवयी आरोग्यपूर्ण आणि निसर्गचक्राला अनुसरून तयार करून घेणं गरजेचं आहे. जेवण्याच्या वेळापत्रकात सुसूत्रता आल्यामुळेदेखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
अधिक वाचा - Smoking Addiction : स्मोकिंगचं व्यसन सहज सुटेल, रोजच्या आहारात खा या पाच गोष्टी
अनेकांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्यांना ते माहित असतं. मात्र काही प्रसंगी मनावर ताबा न राहिल्यामुळे त्यांच्याकडून प्रमाणाबाहेर गोड खाल्लं जातं. कधी पार्टीमध्ये, कधी समारंभात तर कधी भावनिक प्रसंगात अति खाण्याचे प्रकार घडतात. मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या भावनांवर आणि मूडवर ताबा मिळवणं गरजेचं आहे.
अर्थात, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला रक्तातील साखरेसंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर मात्र लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या.