Weight Loss Diet chart in marathi:आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जास्त वजनामुळे तुमचे शरीर बेढब तर दिसतचं शिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. हे वजन कमी करताना अनेक जण जीममध्ये घाम गाळतात किंवा महागडे डाएट प्लॅन करतात. पण हे प्रयत्न करूनही, वजन कमी होत नसेल तर नैसर्गिक मार्गाचा अवलंब करण्याची वेळ आली आहे असे समजावे. व्यायाम केल्याने वजन कमी होते हे खरे आहे, पण यासोबतच खाण्यापिण्याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला जास्त कष्ट न करता वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही या टिप्स फॉलो करा. (Follow these natural tips for Weight Loss Diet)
मध आणि लिंबू पाणी
लिंबू आणि मध या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात लिंबू 2 चमचे मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. मधामध्ये औषधी गुणधर्म असतात तर लिंबू पचनसंस्थेला डिटॉक्स करण्यास मदत करते. या सर्वांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
मेथी, ओवा आणि जिरे पावडर
मेथी दाणे चयापचय क्रिया सुरळीत ठेवतात, त्यामुळे चरबी कमी होते. त्याचप्रमाणे, ओवा आणि काळे जिरे हेही पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. सर्व मसाले एकत्र भाजून त्याची पावडर बनवा आणि ही पावडर एक ग्लास पाण्यात टाकून दिवसातून एकदा प्या.
दालचिनी आणि मधाचा चहा
दालचिनी हा मसाला अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. दालचिनी वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. गोड खाण्याची लालसा कमी करण्यासाठी आणि रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही रोज दालचिनीच्या चहामध्ये एक चमचा मध घाला आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
कच्चा लसूण चघळा
लसणामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी लसणाच्या दोन किंवा अधिक पाकळ्या खाणे खूप फायदेशीर आहे. पण लसून खाल्ल्यानंतर दात आवश्य घासा, कारण कच्च्या लसणाचा वास तुमच्या तोंडात दिवसभर राहू शकतो.
साखर खाणं बंद करा
फळे आणि भाज्यांमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर केवळ नैसर्गिक साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करा. मिठाई, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ खाणे टाळा.
पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा
दररोज पुरेसे पाणी पिणे हे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी घरगुती उपाय आहे. अनेक लोक फक्त तहान लागल्यानंतरच पाणी पितात. पण त्याऐवजी तुमच्या वजनाला 30 ने डिव्हाईड करा. म्हणजे तुमचे वजन 65 किलो असेल, तर तुम्ही रोज 65/30 = 2.16 लिटर पाणी पिणे गरजचे आहे.
अधिक वाचा: Millets or Millet : कॅल्शिअम, आयर्न, प्रोटिन्ससाठी खा हे पदार्थ
8 तासांची झोप आवश्यक
झोपणं कोणाला आवडत नाही आणि त्यामुळे वजन कमी होत असेल तर सोन्याहून पिवळं. शांत झोपेमुळे पचनसंस्था सुधारते. झोपेमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे दररोज किमान 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
दिवसातून अनेक वेळा पण कमी प्रमाणात खा
सर्वसामान्यपणे नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे तीनवेळा खाल्ले जाते. पण त्याऐवजी जर 3-4 तासांनी हलके काहीतरी खाण्याचा प्रयत्न करा. 3 वेळा पोट भरुन जेवण्याऐवजी 6 भागांमध्ये हलके जेवण खा. हे फायदेशीर आहे. शिवाय यामुळे तुमचे पोट नेहमी रिकामे राहत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची पचनक्रिया चांगली होते आणि चयापचय क्रिया सुधारते.
अधिक वाचा: Health Tips: वेट लॉससाठी चिकन की पनीर? जाणून घ्या दोन्हीमधला फरक
जेवताना अन्न चावून खा
प्रत्येक घास चावून खाणे हे अन्न पचन व्यवस्थित होण्यासाठी आणि जास्त खाणे टाळण्यासाठी आवश्यक आहे. असे म्हटले जाते की जे लोक प्रत्येक घास चावून खातात ते कमी कॅलरी वापरतात. कारण चावल्याने घासाचे लहान तुकडे होते आणि लाळ मिसळून पचनास मदत होते. घास नीट चावला नाही तर अन्न पचायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे वजन वाढते.
हा लेख फक्त माहितीसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्याआधी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.