Health Tips: झोप (Sleep) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. दिवसभर ऊर्जा (Energy) टिकून राहण्यासाठी आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी पुरेशी आणि गाढ झोप आवश्यक असते. चांगल्या झोपेमुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारख्या शारीरिक आजारांसोबत अनेक मानसिक आजारही दूर राहतात. मात्र अनेकांना इच्छा असूनही गाढ झोप लागत नाही. रात्रभर कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांची झोप डिस्टर्ब होत राहते आणि त्याचा दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. रात्रीच्या जेवणादरम्यान केलेल्या काही चुकांमुळेही झोपेवर परिणाम होत असल्याचं दिसून येतं. झोप न लागणे किंवा सतत झोपमोड होणे यामागे पोटाशी संबंधित विकार असण्याचीही शक्यता असते. रात्रीच्या जेवणात नेमक्या कुठल्या चुका होतात, ज्या टाळणं गरजेचं असतं, हे जाणून घेऊया.
काही लोकांना जेवण झाल्यानंतरही त्याच जागी बसून राहण्याची सवय असते. असं केल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक विकार जडण्याची शक्यता निर्माण होते. जेवणानंतर एकाच जागी बसून राहिल्यामुळे अन्न नीट पचू शकत नाही. त्यामुळे आपली झोप वारंवार डिस्टर्ब होत राहते. त्यामुळे रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने एक वॉक घेण्याची गरज असते. त्यामुळे झोपेचा दर्जा सुधारायला आणि पचन चांगले व्हायला मदत होते.
अधिक वाचा - Exercise for cervical : सर्व्हाईकलच्या वेदना करतात जगणं कठीण, या उपायांनी मिळेल दिलासा
जेवण झाल्यावर भरपूर पाणी पिण्याची चूक अनेकजण करताना दिसतात. त्यामुळे पचन कऱण्यासाठी कार्यरत असणारे अँझायम्स डायल्युट होतात आणि जेवण नीटपणे पचत नाही. त्यामुळे व्यक्तीचं पोट फुगायला सुरुवात होते आणि पोटाशी संबंधित विविध विकार जडायला सुरुवात होते.
काही लोक अत्यंत घाईघाईने जेवण करतात. मात्र जास्त वेगाने अन्न खाल्ल्यामुळे ती नीट चावले जात नाही. नीट चावले न गेलेले अन्न पचायला अतिशय जड असते. त्यामुळे व्यक्तीचं पोट फुगायला सुरुवात होते. शिवाय व्यक्तीचं वजन वाढायलाही सुरुवात होते. जास्त वेगाने अन्न खाणाऱ्या व्यक्तींचं वजन इतरांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत असल्याचं वारंवार दिसून येतं. त्यामुळे प्रत्येक घास चावून चावून खाणे आणि सावकाश जेवण करणे गाढ झोप येण्यासाठी आवश्यक असते.
अधिक वाचा - Motion Sickness: प्रवासात होतो डोकेदुखी आणि उलटीचा त्रास? या चुका टाळा
जेवण आणि झोप यात किमान दोन तासांचे अंतर असणे आवश्यक असते. अन्नपचासाठी हा कालावधी आवश्यक मानला जातो. अनेकजण रात्री उशिरा जेवण करतात आणि जेवण झाल्या झाल्या झोपतात. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास शरीराला वेळ मिळत नाही. त्याऐवजी रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करून दोन तासांनी झोपल्यानंतर झोपेचा दर्जा सुधारण्याची शक्यता असते.