रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर सरकारने घातली बंदी

तब्येत पाणी
Updated Apr 11, 2021 | 20:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशात कोविडच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. त्यामुळे रेमडेसिविरचा साठा अपूरा पडत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

Ban on export of Remdesivir injection by government
केंद्र सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर घातली बंदी 

थोडं पण कामाचं

  • देशात कोविडच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
  • रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर सरकारची बंदी
  • फार्मा कंपन्यांना स्टॉकिस्ट्स आणि डिस्ट्रिब्युटर्सची माहिती वेबसाईट टाकण्याची सूचना

नवी दिल्ली : देशात कोविड रुग्णांच्या संख्येने सातत्याने मोठी वाढ होते आहे. कोविडच्या गंभीर रुग्णांसाठीच्या इलाजासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) वापर केला जातो आहे. मात्र रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा देशभर जाणवतो आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने आता रेमडेसिविर इंजेक्शनच्या (Remdesivir Active Pharmaceutical Ingredients) (API) निर्यातीवर बंदी घातली आहे. 

फार्मा कंपन्यांना सूचना

भारतात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या सर्वच फार्मा कंपन्यांना आपल्या स्टॉकिस्ट्स आणि डिस्ट्रिब्युटर्सची माहिती आपल्या वेबसाईट टाकण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. सर्वसामान्यांपर्यत सुलभपणे रेमडेसिविर इंजेक्शन पोचवले जावे यासाठी ही सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा तपासण्याच्या सूचना देशातील ड्रग्स इन्सपेक्टर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या ओषधाची साठेबाजी आणि काळाबाजार होऊ नये यासाठी सरकारकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.

एपीआयवर देखील बंदी

रेमडेसिविर इंजेक्शन व्यतिरिक्त सरकारने याच्या 'एक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट'च्या (API)निर्यातीवरदेखील बंदी घातली आहे. एपीआयमध्ये कोणत्याही औषधातील मुख्य औषधी द्रव्य किंवा पदार्थ असतो. अनेक भारतीय कंपन्या तयार औषधांव्यतिरिक्त त्या औषधाशी संबंधित एपीआयची देखील निर्यात करतात. या एपीआयचा वापर करूनच अंतिम औषध बनवले जाते.

देशातील अनेक भागात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

मागील काही दिवसांत कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे इस्पितळातील बेड अपुरे ठरत आहेत. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा संपण्याचीही भर पडली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रेमडेसिविरचा तुटवडा

महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ होत असतानाच कोरोनाच्या इलाजातील महत्त्वाचे औषध असलेल्या रेमडेसिविरचाही तुटवडा जाणवतो आहे. गुजरात सरकारने पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी १०,००० रेमडेसिविर इंजेक्शन एअरलिफ्ट करून सूरत येथे मागवले आहेत. ही माहिती सर्वसामान्यांपर्यत पोचल्यानंतर सूरत येथील किरण हॉस्पिटलसमोर लांबचलांब रांग लागली होती. नागरिक सकाळी ६ वाजेपासूनच रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. ही परिस्थिती झायडस हॉस्पिटलमध्येही दिसून आली. 

महाराष्ट्राच्या अनेक भागांदेखील रेमडेसिविरचा तुटवडा जाणवतो आहे. विशेषत: नागपूरमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा साठा संपल्याचे आणि औषधाच्या दुकानांसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग होतो आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याशिवाय लसीकरणाचा कार्यक्रम जोरात सुरू असताना लशीचाही तुटवडा जाणवतो आहे. भारतीय औषध उत्पादक कंपन्यांसमोर कोरोना महामारीमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली असून लवकरात लवकर औषधे रुग्णांसमोर पोचवण्याचा दबाव आहे. 

महाराष्ट्रातील रुग्णांची वाढती संख्या आणि संसर्गाचा विस्तार पाहून राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. जर परिस्थिती आटोक्यात आली नाही तर राज्यात पुढील काही दिवसात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी