First Human Case of H3N8 Bird Flu: नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या लाटेत XE प्रकारामुळे त्रस्त असलेल्या चीनची चिंता अजून वाढली आहे. कोरोना संसर्गादरम्यान, मंगळवारी हेनान प्रांतातील एका व्यक्तीला बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेन इन्फेक्शन झाल्याची पुष्टी झाली आहे. मानवामध्ये या स्ट्रेनची लागण होण्याची ही पहिलीच वेळ असून चीन सरकारने या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
NHC ने केली पुष्टी
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) सांगितले की, लोकांनी याबद्दल घाबरण्याची गरज नाही. हा संसर्ग पसरण्याचा धोका खूप कमी आहे. अधिका-यांनी सांगितले की, एका मुलामध्ये या स्ट्रेनची लागण झाल्याचं आढळून आले आहे. या चार वर्षांच्या मुलामध्ये तापासह इतर अनेक लक्षणे दिसून आली आहेत. तपासणी केल्यानंतर मुलाला बर्ड फ्लूचा H3N8 स्ट्रेनची इन्फेक्शन असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
NHC नुसार, या मुलाच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये हा विषाणू आढळला नाही. बर्ल्ड फ्लूने ग्रस्त झालेला मुलगा त्याच्या घरात पाळण्यात आलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता. सध्या कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. अशा स्थितीत या काळात संसर्ग झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितले की, H3N8 चे लक्षणे आतापर्यंत घोडे, कुत्रे, पक्षी आणि सील या प्राण्यांमध्ये आढळून आली आहेत, परंतु मानवांमध्ये हा स्ट्रेन आढळून येण्याची ही पहिलीच घटना आहे. या विषाणूमध्ये अशी लक्षणे आढळली नाहीत ज्यामुळे ते एकमेकांपासून पसरतात आणि महामारीचे रुप घेऊ शकतील. तरीही आमची एक टीम त्यावर लक्ष ठेवून आहे.