Ghee in winter : देशभरात थंडी (Cold) पडायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या या काळात गरम कपडे, मॉइश्युरायझर यासह अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. आपल्याला थंडीचा त्रास होऊ नये, शरीर उबदार राहावं यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःची काळजी घेत असल्याचं दिसतं. मात्र शरीराला बाहेरून ज्या प्रकारे उष्णतेची गरज असते, तशीच आतूनही असते. ही उष्णता पुरवण्याचं आणि थंडीत आरोग्य उत्तम राखण्याचं काम करणारा घटक म्हणजे तूप. थंडीत सर्दी खोकल्यासारख्या आजारापासून संरक्षण कऱण्यासाठी तूप (Ghee) हा एक उपयुक्त घटक मानला जातो.
थंडीच्या काळात आहारात तुपाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील अँठी इन्फमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहायला मदत होते. जाणून घेऊया तुपाचे इतर काही फायदे.
थंडीत तूप खाण्याने शरीराला आतून उष्णता मिळते. तुपामुळे अन्नाची चवदेखील वाढते. चपाती, भाकरीला लावून किंवा भाजी, आमटीत मिसळून तुपाचे सेवन करता येऊ शकते.
अधिक वाचा - Weight Loss Surgery: वेटलॉस सर्जरीदरम्यान महिलेचा मृत्यू, काय असते बॅरिॲट्रिक सर्जरी? वाचा सविस्तर
तुपात अनेक पोषक घटक असतात. आतड्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तूप खाण्याने पचनासंबंधी विकार दूर ठेवता येणं शक्य होतं. पोळीवर तूप घेतल्यामुळे त्याची चव तर सुधारतेच, शिवाय अपचनाची समस्यादेखील दूर होते.
खोकल्यातील काही गुणधर्मांमुळे सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. गायीच्या साजूक तुपाचे काही थेंब नाकात घातल्याने सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम पडत असल्याचं सांगितलं जातं.
तुपाचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही, तर त्वचा मॉयश्चुराईज करण्यासाठीदेखील करता येऊ शकतो. तूप त्वचेवर लावल्यामुळे त्वचा चमकदार, मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. कोरडी त्वचा सुधारण्यास त्यामुळे मोठी मदत होते.
अधिक वाचा - World Aids Day 2022: का साजरा केला जातो जागतिक एड्स दिन; जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि इतिहास
वास्तविक, कुठल्याही ऋतुत तूप हे आरोग्यासाठी फायदेशीरच मानलं जातं. मात्र थंडीत तुपाचा आरोग्याला विशेष फायदा होतो. रोजच्या आहारातील एक घटक म्हणूनच त्याचा समावेश करा. तुमच्या चपातीवर, भाकरीवर किंवा रोटीवर तूप लावल्यामुळे त्याची चवदेखील वाढेल आणि ती पचायला सोपं जाईल. मात्र तुपाचं प्रमाण मर्यादित असणं आवश्यक आहे. थंडीच्या काळात स्वयंपाकासाठी रिफाइन्ड तेलाऐवजी तुपाचाही वापर तुम्ही करू शकता. साईड डिशसाठी काही भाज्या तुपात घोळून तुम्ही सर्व्ह करू शकता. बेकिंग रेसिपीमध्ये बटरऐवजी तुम्ही तुपाचा पर्याय निवडू शकता. त्याचप्रमाणे होममेड पॉपकॉर्न, केक यासारखे पदार्थ बनवण्यासाठीदेखील तुम्ही तुपाचा उपयोग करू शकता.
कच्ची हळद आणि तूप एकत्र करून त्यापासून मॉर्निंग ड्रिंक्स तयार करता येतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते आणि पूर्ण थंडीत तुम्ही अगदी फिट आणि आनंदी राहू शकाल.
डिस्क्लेमर - थंडीतील तुपाच्या फायद्याबाबत सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेली ही माहिती आणि टिप्स आहेत.