Mood swing remedies: जेव्हा एखाद्याच्या वर्तनात (Behaviour) अचानक काही बदल होतात, तेव्हा त्याला मूड स्विंग (Mood Swing) असं म्हटलं जातं. अनेकांना वारंवार मूड स्विंगची समस्या जाणवते. आपण एखाद्या विशिष्ट मूडमध्ये असताना अचानक आपला मूड बदलतो. आनंदी असणारा माणूस अचानक दुःखी होतो. आनंदाने काम करता करता अचानक राग यायला सुरुवात होते. अशा प्रकारच्या मूड स्विंगमुळे व्यक्तीच्या कामावर (work) आणि करिअरवरही (Career) परिणाम होत असतो. अशा अवस्थेत शरीरातील ऊर्जा कमी होते आणि व्यक्ती सक्रीय राहत नाही. त्याशिवाय सततची चिडचिड, भूक कमी होणे किंवा प्रचंड भूक लागणे, झोप कमी होणे यासारख्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. काही घरगुती उपायांनी या आजारावर मात करता येते. जाणून घेऊया, असेच काही सोपे उपाय.
मूड स्विंगची समस्या दूर करण्यासाठी ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्याशिवाय खाण्यापिण्यात व्हिटॅमिन सी चं प्रमाण वाढवण्याची गरज असते. क जीवनसत्त्वामुळे मूड स्विंग आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला मूड स्विंगची समस्या असेल, तर आहारात फायबर आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवायला सुरुवात करा.
डीप ब्रिदींगमुळे मूड स्विंगच्या समस्येपासून दिलासा मिळायला मदत होते. त्यासाठी एका शांत जागेवर बसा. ध्यानमुद्रा धारण करा. हळूहळू आणि दीर्घ श्वास घ्या आणि तितक्याच हळूवारपणे बाहेर सोडा. ही क्रिया दहा वेळा करा. त्याचप्रमाणे रोजच्या रोज व्यायाम केल्यामुळेही मूड स्विंगची समस्या दूर होण्यास मदत होते. तुमचा मूड अचानक ऑफ झाला, तर घराबाहेर पडून चालायला जाणे, हा त्यावरील उत्तम उपाय असतो.
पाणी प्या
जर तुम्हाला मूड स्विंगची समस्या असेल, तर मुबलक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळेदेखील मूड स्विंगची समस्या उद्भवत असते. त्यामुळे दररोज किमान सात ते आठ लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
अधिक वाचा - Health Tips: झोपण्यापूर्वी ‘या’ कामाची लावा सवय, भलेमोठे आजारही जातील पळून
गेल्या काही वर्षात सदोष लाईफस्टाईलचा परिणाम जसा शरीरावर होताना दिसतो, तसाच मानसिक आरोग्यावरही होत असल्याचं दिसून आलं आहे. चुकीची आहारपद्धती, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा आणि अपुरी झोप या कारणामुळेही मूड स्विंगच्या समस्येत तेल ओतलं जात असल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात वाढलेले ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता हीदेखील मानसिक आजारांमागील महत्त्वाची कारणं असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे योग्य आणि संतुलित आहार घेणे, दैनंदिन व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे ही त्रिसुत्री मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं दिसून आलं आहे.
डिस्क्लेमर - मूड स्विंगवरील हे काही घरगुती उपचार आणि सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.