Hearing Loss: तुमचा हेडफोन तुम्हाला करतोय बहिरं, ‘या’ टिप्स करू शकतात बचाव

सातत्याने हेडफोन वापरल्यामुळे तुम्हाला कायमस्वरुपी बाहेरचे आवाज ऐकू येणं बंद होण्याची शक्यता असते. हेडफोनच्या अतिवापराने आणि चुकीच्या वापराने तुमच्या कानांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. तुमचं हे आवडतं डिव्हाईस एक दिवस तुमची ऐकण्याची क्षमताच संपवू शकतं.

Hearing Loss
तुमचा हेडफोन तुम्हाला करतोय बहिरं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हेडफोनमुळे ऐकण्याच्या क्षमतेवर होतो विपरित परिणाम
  • आवाज वाढवल्यामुळे ऐकू येण्याची क्षमता होते कमी
  • व्हॉईस कॅन्सलिंग हेडफोनचा करू शकता वापर

Hearing Loss: इयरफोन,इयरबड किंवा हेडफोन (Headphone and earphone) घेतल्याशिवाय आजकाल बरेचजण घराबाहेरही पडत नाहीत. प्रवासात काही ना काही ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हेडफोनचा वापर केला जातो. काहीजणांकडे आजूबाजूच्या लोकांचा आवाज कानावर पडू देणारं डिव्हाईस असतं. अशा लोकांना आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत, याचा पत्ताही लागत नाही. ते आपल्या दुनियेत मशगूल असतात. मात्र सातत्याने हेडफोन वापरल्यामुळे तुम्हाला कायमस्वरुपी बाहेरचे आवाज ऐकू येणं बंद होण्याची (Hearing Loss) शक्यता असते. हेडफोनच्या अतिवापराने आणि चुकीच्या वापराने तुमच्या कानांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. तुमचं हे आवडतं डिव्हाईस एक दिवस तुमची ऐकण्याची क्षमताच संपवू शकतं. 

काय सांगतो अभ्यास?

बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, स्मार्टफोन, हेडफोन आणि इयरबड यासारख्या उपकरणांचा उपयोग करणारे 100 कोटींपेक्षाही जास्त लोक जगभरात ऐकण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. 

एवढा आवाज कानासाठी त्रासदायक

अगोदर झालेल्या संशोधनानुसार लोक 105 डीबीपर्यंतचा आवाज ऐकत असल्याचं स्पष्ट झालं होतं. तर मनोरंजनाच्या ठिकाणी हा आवाज 112 डीबीपर्यंत जातो. आवाजाची ही पातळी कानांसाठी धोकादायक मानली जाते. 

अधिक वाचा - Weight Loss Mistakes : वजन कमी करताना या 5 चुका फिरवतात मेहनतीवर पाणी...जाणून घ्या योग्य पद्धत

आवाज ठेवा कमी

जर तुम्ही नियमितपणे जास्त काळासाठी हेडफोनचा वापर करत असाल, तर त्याच्या आवाजाची लेव्हल कमीत कमी ठेवणं आवश्यक आहे. ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी कुठल्याही डिव्हाईसचा आवाज एका मर्यादेपलिकडे न वाढवण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा प्रवासात आजूबाजूच्या लोकांचे, गाड्यांचे आणि इतर आवाज आपल्याला डिस्टर्ब करत असतात. ते टाळण्यासाठी आपण हेडफोनमध्ये आवाज फुल करतो. त्यामुळे आजूबाजूच्या आवाजांऐवजी आपल्याला आपण पाहत किंवा ऐकत असलेल्या गोष्टीचाच आवाज नीटपणे ऐकता येतो. मात्र असं करणं हे कानाच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं दिसून येतं. ऐकण्याच्या क्षमतेवर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. 

व्हॉईल कॅन्सलिंग हेडफोन

आजूबाजूच्या आवाजावर उपाय म्हणून कानात घातलेल्या इयरफोनचा आवाज वाढवणं, हे कानाच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारं असतं. त्याऐवजी व्हॉईस कॅन्सलिंग हेडफोनचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कमी आवाजातही ऐकण्याच्या चांगला अनुभव या हेडफोनमुळे घेता येऊ शकतो. 

अधिक वाचा - ऐकलं का! या मर्यादेपेक्षा कमी स्पर्म काउंट असेल मुल होणं असतं अवघड

हेडफोनचा वापर करा कमी

हेडफोनचा वापर जितका कमी कराल, तितकं तुमच्या कानांचं होणारं नुकसान कमी होऊ शकेल. जर तुम्ही दिवसातील बहुतांश वेळ हेडफोन लावून घालवत असाल, तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे दीर्घकाळ तुमचे कान शाबूत राहतील आणि तुमची ऐकण्याची क्षमता कमी होणार नाही. 

डिस्क्लेमर - कानांच्या आरोग्य आणि हेडफोन याबाबत सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न अथवा समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी