Back Pain in Winter: थंडीत सुरु होते कंबरदुखी, लसूण आणि आल्यापासून ‘असं’ बनवा पेनकिलर

थंडीच्या काळात एका जागी बसण्यामुळे ऊब निर्माण होत असली, तरी त्यापाठोपाठ कंबरदुखी आणि सांधेदुखीदेखील डोकं वर काढण्याची शक्यता असते. सतत एका जागी बसल्यामुळे आणि दिवसभर शरीराची हालचाल न केल्यामुळे सांधे आखडणे आणि कंबर, पाठ, मान यासारखे अवयव दुखायला सुरुवात होते.

Back Pain in Winter
कंबरदुखीसाठी घरगुती पेनकिलर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात अनेकांना होतो कंबरदुखी आणि स्नायू आखडल्याचा त्रास
  • एकाच जागी अनेक तास बसल्यामुळे आखडतात स्नायू
  • घरगुती उपायांनी पळवून लावता येईल कंबरदुखी

Back pain in Winter: थंडी आल्यानंतर (Winter) साधारणतः आराम करण्याची प्रवृत्ती वाढते. अंगातील सुस्तीला थोडा वाव मिळू लागतो आणि अंथरुणात लोळत पडण्याकडचा कल वाढताना दिसतो. दीर्घ काळ एकाच जागी बसणे, अंथरुणातून बराच काळ न हलणे यासारख्या गोष्टी हिवाळ्यात आवडू लागतात. त्यानंतर बैठं काम करणारे अनेकजण दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईल घेऊन एकाच जागी बसतात. त्यात वातावरणात थंडी असल्यामुळे एका जागी तयार झालेली ऊब सोडावीशी कुणालाही वाटत नाही. मात्र थंडीच्या काळात एका जागी बसण्यामुळे ऊब निर्माण होत असली, तरी त्यापाठोपाठ कंबरदुखी आणि सांधेदुखीदेखील डोकं वर काढण्याची शक्यता असते. सतत एका जागी बसल्यामुळे आणि दिवसभर शरीराची हालचाल न केल्यामुळे सांधे आखडणे आणि कंबर, पाठ, मान यासारखे अवयव दुखायला सुरु होण्याची शक्यता असते. 

त्रासदायक वेदना

स्नायू आखडल्यामुळे होणाऱ्या वेदना या प्रचंड त्रासदायक असतात. या वेदनांचं वैद्यकीय स्वरुप गंभीर नसलं तरी त्यामुळे होणारे त्रास सहन करणं हा एक नकोसा अनुभव असतो. असे त्रास होऊ लागल्यानंतर बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची पेनकिलर्स आणली जातात. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदतही होते. मात्र त्याचे अनेक साईड इफेक्ट्स आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. काही घरगुती उपायांनी कंबरदुखी कमी करता येऊ शकते. जाणून घेऊया, असेच काही घरगुती उपाय. 

मोहरीचं तेल

जर तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करत असाल, तर तुमच्या पाठीला आणि कंबरेला नियमित मसाज करण्याची गरज आहे. त्यामुळे हाडांचं पोषण होतं आणि कंबरदुखी आणि सांधेदुखीची शक्यता कमी होते. रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने कंबरेला आणि पाठीला मसाज करून घ्या आणि सकाळी उठल्यावर गरम पाण्याने अंघोळ करा. त्यामुळे कंबरदुखीचा त्रास जाणवणार नाही. 

अधिक वाचा - Morning Sore Throat: झोपेतून उठल्यावर घसा का खवखवतो? करा ‘हे’ घरगुती उपाय

आलं

कंबरदुखीवर आलं हा एक उत्तम उपाय मानला जातो. जर तुम्ही चहातून, पाण्यातून किंवा काढ्यातून आलं खात असाल, तर त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. कुठल्याही स्वरुपात आलं खाण्याचा सल्ला हिवाळ्यात दिला जातो. आल्यात अँटि इन्फमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे सांध्यातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 

थंड/गरम पाण्याने शेक

जर तुमची पाठ किंवा कंबर दुखत असेल, तर थंड किंवा गरम पाण्याने शेक देणं, हा त्यावरचा एक उत्तम उपाय ठरू शकतो. असं केल्याने स्नायू रिलॅक्स होतात आणि स्नायूंमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी होते. 

हळद आणि दूध

कुठल्याही प्रकारच्या शारीरिक वेदना कमी करण्यासाठी हळद सर्वोत्तम मानली जाते. त्यात असणाऱ्या अँटिसेप्टिक, अँटिबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे वेदना कमी होतात. हळदीत करक्यूमीन नावाचा घटक आढळतो, जो सर्दी, खोकला, इन्फेक्शन,सांधेदुखी यासारख्या विकारांपासून तुमचं संरक्षण करू शकतो. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पित असाल, तर तुम्हाला कंबरदुखीपासून दिलासा मिळू शकतो.

अधिक वाचा - कमी वयातच दाढी झाली सफेद? जाणून घ्या या मागील चार कारणे

मेथी

कंबरदुखीचं प्रमाण जास्त असेल, तर मेथीच्या दाण्यांची पावडर हा त्यावरील उत्तम उपाय ठरू शकतो. त्यासाठी एक कप दुधात एक चमचा मेथीची पावडर आणि मध मिसळून प्यावा. एक ते दोन तासात फरक पडत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. 

लसूण

कंबरदुखी कमी करण्यासाठी लसणाच्या दहा पाकळ्या घ्या. त्या कुटून त्याची पेस्ट तयार करा. वेदना होत असलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावल्यानंतर काही तासांतच वेदना कमी होत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. 

डिस्क्लेमर - कंबरदुखी आणि सांधेदुखी कमी कऱण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी