Alcohol quantity : कुठल्या वयात किती मद्यपान योग्य? ‘द लँसेट’च्या अहवालातून खुलासा, वाचा सविस्तर

कुठल्या वयोगटात किती अल्कोहोलचं सेवन करावं, याबाबतचा एक अहवाल नुकताच ‘द लँसेट’ या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. अल्कोहोलचं सेवन करणाऱ्यांसाठी त्यातील निष्कर्ष महत्त्वाचे आहेत.

Alcohol quantity
कुठल्या वयात किती मद्यपान योग्य?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वयोगटानुसार अल्कोहोलचा कमीजास्त होतो धोका
  • कमी वयात अल्कोहोलचा सर्वाधिक धोका
  • चाळीशीनंतर होतो अल्कोहोलचा धोका कमी

Alcohol Quantity | तुम्ही जर मद्यपान करत असाल आणि नेमकी किती दारू प्यावी, असा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल, तर आता त्याचं उत्तर मिळू शकणार आहे. अनेकदा प्रमाणापेक्षा अधिक दारूचं सेवन केलं जातं आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवायला सुरुवात होते. सातत्याने हे घडलं तर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळू शकतं आणि अचानक मृत्यू येण्याचाही धोका बळावतो. अशा परिस्थितीत मद्यपान करताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि कुठल्या वयोगटात किती अल्कोहोल शरीरात घेतलेलं योग्य असतं, याबाबतचा एक अभ्यास जाहीर करण्यात आला आहे. मेडिकल रिसर्च जर्नल ‘द लँसेट’मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून वयोगटातून मद्यपान करण्याच्या धोक्यांबाबत काही महत्त्वाची निरीक्षणं त्यात नोंदवण्यात आली आहेत. 

प्रमाणापेक्षा अधिक सेवन

व्यक्तीचं वय जितकं कमी असेल तितकं त्या व्यक्तीसाठी अल्कोहोल धोकादायक असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलं आहे. चाळीशीनंतर अल्कोहोलचं सेवन करणाऱ्यांना जितका धोका असतो, त्याच्या तुलनेत कितीतरी अधिक पट धोका हा चाळीशीपूर्वी अल्कोहोलचं सेवन करणाऱ्यांना असतो. जगातील वेगवेगळे खंड, लिंग आणि वय यांच्या आधारावर हा सर्व्हे करण्यात आला होता. यात 204 देशातील विविध वयोगटातील पुरुष आणि महिलांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यातील नोंदीनुसार 2020 मध्ये 1.34 बिलियन नागरिकांनी धोकादायक पातळीपर्यंत अल्कोहोलचं सेवन केलं. यापैकी 1.03 बिलियन पुरुष होते, तर 0.312 मिलियन महिला होत्या. 

अधिक वाचा - Dental Care : फास्टफूड आणि गुटख्यामुळे दात कमकुवत होऊन पडण्याची शक्यता, वेळीच करा हे उपाय

चाळीशीपूर्वी अधिक धोका

या अभ्यासात नोंदवण्यात आलेल्या निष्कर्षानुसार 15 ते 39 वयोगटातील पुरुषांना मद्यपानाचा सर्वाधिक धोका असतो. जगातील वेगवेगळ्या खंडातील वेगवेगळ्या देशांत हाच ट्रेंड नोंदवण्यात आला. जगभरात असुरक्षित प्रमाणात दारु पिण्याचं प्रमाणही याच वयोगटात असल्याचं आढळून आलं. 2020 साली जगभरात प्रमाणापेक्षा अधिक दारू पिणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 59.1 लोकसंख्या ही 15 ते 39 या वयोगटातील होती. त्यापैकी 76.7 टक्के हे पुरुष होते. 

भारतातील स्थिती

या सर्वेक्षणानुसार भारतात 2020 साली 15 ते 39 या वयोगटातील 1.85 टक्के महिलांनी धोकादायक पातळीवर अल्कोहोलचं सेवन केलं होतं. पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण होतं 25.7 टक्के. तर 40 ते 64 या वयोगटाबाबतीत महिलांमध्ये हे प्रमाण होतं 1.79 टक्के आणि पुरुषांमध्ये होतं 23 टक्के. 

अधिक वाचा - Super Foods : आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी पाच आश्चर्यकारक सुपरफूड...आठवड्यातून दोनदा खा आणि जादू पाहा...

किती अल्कोहोल योग्य?

कुठल्या वयोगटासाठी किती अल्कोहोल योग्य ठरेल, याचे तपशीलही या अहवालात देण्यात आले आहेत. त्यानुसार 15 ते 39 या वयोगटातील पुरुषांसाठी 0.136 स्टँडर्ड ड्रिंक तर महिलांसाठी 0.273 स्टंडर्ड ड्रिंक्स हे प्रमाण योग्य असल्याचं म्हटलं आहे. 

40 ते 65 वयोगटातील पुरुषांसाठी प्रतिदिन 0.527 तर महिलांसाठी 0.562 हा सुरक्षित मानला गेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी