Weather Change Sickness: पावसाळा (Monsoon) संपून आता हिवाळ्याचं (Winter) आमगन झालं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात आता थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. काही भागात कमी तर काही भागात बऱ्यापैकी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. हवेतील या बदलासोबतच काही आजारदेखील येऊ घातल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाचे पाणी साचून अनेक भागात डेंग्यु (Dengue), चिकनगुनिया (Chikungunya), मलेरिया (Malaria) यासारखे आजार फैलावत चालल्याचं चित्र आहे. या आजारांपासून स्वतःची काळजी घेतली नाही, तर कुणीही कधीही हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाचा वेळीच अंदाज घेणं आणि त्यानुसार आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया, बदलत्या ऋतुत नेमक्या कुठल्या आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्याची गरज आहे.
बदलत्या वातावरणात सर्वाधिक वेगाने जडणारा आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यांना हा आजार त्वरित जडण्याची शक्यता असते. या आजारात सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं दिसू शकतात. त्याशिवाय या काळात फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पोटाचं इन्फेक्शन यासारखे विकारही जडायला सुरुवात होत असते. स्वच्छता आणि खाण्यापिण्याच्या योग्य सवयी हाच यावरचा सर्वोत्तम उपाय मानला जातो. थंडीच्या दिवसांत शक्यतो आलं, मिरी, हळद यासारख्या पदार्थांचा आहारात अधिकाधिक वापर करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे थंड पदार्थ खाणे आणि पिणे टाळण्याची गरज असते.
अधिक वाचा - Healthy Diet: बद्धकोष्ठतेसह पोटाच्या अनेक समस्या होईल दूर...आहारात करा याचा समावेश
खरंतर डेंग्यू हा पावसाळ्यातच पसरणारा आजार आहे. मात्र यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक भागांत पाऊस होता. त्यामुळे त्याचा परिणाम अद्यापही होत असल्याचं चित्र आहे. परिणामी थंडीच्या तोंडावर डेंग्यू आजाराने तोंड वर काढल्याचं दिसून येत आहे. कडक ताप, सांधेदुखी आणि प्लेटलेट्स कमी होणं, ही या आजाराची लक्षणे आहेत.
मादी डासाच्या चावण्यामुळे हा आजार फैलावत असतो. डास चावल्यानंतर साधारण आठवडाभरात रुग्णाला चिकनगुनियाची लक्षणं दिसायला सुरुवात होते. या आजारात ताप येणे, सांधेदुखी आणि शरीरावर चट्टे उठणे यासारखी लक्षणे जाणवतात.
अधिक वाचा - Diabetes अन् Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी, म्हटलं जातं ऑल इन वन औषधी वनस्पती
थंडीच्या काळात लहान मुलांना टॉन्सिल्सचा त्रास होत असल्याचं आपण अनेकदा पाहतो. या आजारात घशात वेदना होतात आणि ताप येतो. या काळात अन्न गिळायला त्रास होत असतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार जडण्याची शक्यता असते. यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी थंड पदार्थांचं सेवन टाळणं आवश्यक आहे.
डिस्क्लेमर - हिवाळ्यातील आजारांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि सल्ले आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.