जीवघेण्या व्हायरसपासून वाचायचं असेल तर पहिले 'ही' नशा सोडा!

आपल्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल तर धूम्रपान सोडणे गरजेचं आहे. असं एका संशोधनात म्हटलं आहे. 

If you want to avoid virus infection then first stop smoking
जीवघेण्या व्हायरसपासून वाचायचं असेल तर पहिले 'ही' नशा सोडा!  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सध्याच्या वातावरणात सिगारेट ओढणं ठरु शकतं धोकादायक
  • सिगारटेच्या धूरामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक
  • संशोधनानुसार, कोरोनापासून बचाव करायचा असल्यास धूम्रपान टाळावं

मुंबई: एका नवीन संशोधनानुसार, धूम्रपान सोडल्यास गंभीर कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. कारण सिगरेटचा धूर हा अधिक रिसेप्टर प्रोटीन तयार करण्यासाठी फुफ्फुसात पसरतो आणि या प्रोटीनचा वापर करून व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो.

डेव्हलपमेंटल सेल नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या तपासणीतील निष्कर्षांद्वारे हे स्पष्ट केलेलं आहे  की, धूम्रपान करणार्‍यांना कोव्हिड-१९ या रोगाचा धोका जास्त का आहे. अमेरिकेच्या कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेतील कर्करोग अनुवंशशास्त्रज्ञ आणि या संशोधनाचे वरिष्ठ लेखक जेसन शेल्टझर म्हणाले की, 'आम्हाला आढळून आलं की धूम्रपान केल्यामुळे ACE 2 मध्ये महत्त्वपूर्ण वाढ होते, ज्याद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो.'

(फोटो सौजन्य: Getty)

शास्त्रज्ञांच्या मते, धूम्रपान सोडल्यास गंभीर कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः इतरांच्या तुलनेत हा व्हायरस पुरुष, वृद्ध आणि धूम्रपान करणार्‍या व्यक्ती या तीन गटांमध्ये जास्त विकसित होतो. यांना हा आजार गंभीररित्या होण्याची शक्यता जास्त असते.

संभाव्य स्पष्टीकरणासाठी आधीच प्रकाशित केलेला डेटा पाहता वैज्ञानिकांनी हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे की, या कमकुवत गटांमध्ये मानवी प्रोटीनशी संबंधित काही वैशिष्ट्ये दर्शवलेली आहेत का, ज्यामध्ये विषाणू संक्रमणासाठी अवलंबून असतात. सर्वप्रथम त्यांनी वेगवेगळ्या वयोगटातील, स्त्रिया, पुरुष, धूम्रपान करणारे आणि न करणारे यांच्या फुफ्फुसातील जनुकीय क्रियांची तुलना केली. यावेळी शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की, धूम्रपान करणार्‍यांमध्ये ACE2 हे वाढले आहेत. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये ACE2 ची वाढ ही  ३० ते ५५ टक्के जास्त आहे.

दरम्यान, फुफ्फुसात ACE2 च्या पातळीवर वय किंवा लिंग यांचा काही प्रभाव पडतो का? याबाबत शास्त्रज्ञांना कोणताही पुरावा सापडलेला नाही. आकडेवारीनुसार धूम्रपान न करणार्‍या लोकांच्या फुफ्फुसातील ACE2 चा स्तर हा धूम्रपान न करणार्‍यांसारखेच होता. या संशोधनात असं म्हटले आहे की वायूमार्गाने सर्वाधिक ACE2 तयार होतं. ज्या म्यूकस बनविणाऱ्या पेशी  आहेत. ज्यांना गॉब्लेट सेल्स देखील म्हणतात. धूम्रपान अशा पेशी वाढवण्यासाठी ओळखले जाते. म्हणूनच, जर तुम्हाला कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल तर धूम्रपान सोडणे हेच योग्य ठरेल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी