मुंबईः भारतात, डोळ्यांच्या बाहुलीवरील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्नियल इजेपायी अंदाजे वीस लाख व्यक्ती दृष्टिहीन झाल्या आहेत. या विकारात वेळेवर ट्रान्सप्लांटेशन (प्रत्यारोपण) उपचार झाल्यास एक-चतुर्थांशहून अधिक कॉर्नियल अंधत्वाची समस्या दूर होऊ शकते. शरीराच्या अन्य कोणत्याही इतर अवयवाप्रमाणे डोळ्याच्या कॉर्नियाचे दान मृत्यूपश्चात करणे शक्य आहे. “दरवर्षी दहा हजार कॉर्नियल अंधत्वाची प्रकरणे अस्तित्वात असलेल्या केसमध्ये भर घालतात. त्यामुळे कॉर्नियल प्रत्यारोपणाला वार्षिक मागणी वाढत चालली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी लोकांमध्ये दृष्टिदानाविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळेच राष्ट्रीय दृष्टिदान पंधरवड्याच्या निमित्ताने आपण आपले डोळे दान करणार असल्याचे वचन घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. नीता शहा म्हणाल्या. पीडीईके प्रक्रियेमुळे एक डोळा दान केल्यास दोन किंवा अधिक व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. India Needs Four Times More Eye Donors to Support the Annual Demand for 1 Lakh Corneal Transplantations
दृष्टिदाता हा कोणत्याही लिंगाचा किंवा वयाचा असू शकतो. तरीच दात्याला एड्स, हेपेटायटीस बी आणि सी, रेबीज, सेप्टीसेमिया, अॅक्यूट ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), टीटॅनस, कॉलरा आणि मेनेंजेटीस तसेच एन्सेफलिटीस यासारखे संसर्गजन्य विकार असू नयेत.
मृत्यू-पश्चात सहा ते आठ तासांत डोळा काढून घेणे हितावह ठरते. डोळे काढून घेतल्यानंतर ते मूल्यांकनाकरिता आय बँकेत पाठविले जातात. आणि त्यानंतर त्यांचे पुढील वितरण होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रशिक्षित तज्ज्ञांकडून डोळ्याचे मूल्यमापन होते. प्रतीक्षा यादीत नमूद अंध व्यक्तींना पाचारण करण्यात येते. तातडीने डोळ्यांची गरज असलेल्यांना मार्गदर्शक तत्त्वांत नमूद प्रक्रियेच्या आधारे सेवा देण्यात येते.
भारतात दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने जर एक कोटी मृत्यू होत असतील तर फक्त ५० हजार डोळ्यांचेच दान होते. नेत्रदानाचे प्रमाण मृत्यूच्या तुलनेत जेमतेम ०.५ टक्के आहे. यामुळेच दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. दृष्टिदानातून उपलब्ध झालेल्या डोळ्यांचे प्रत्यारोपण शक्य नसल्यास वैद्यकीय अभ्यास आणि संशोधनासाठी त्या डोळ्यांचा वापर होतो. यामुळेच मृत्यू पश्चात नेत्रदान करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया जिवंतपणी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले.