नवी दिल्ली: भारतात आतापर्यंत ९० लाख ५० हजार ५९७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ८४ लाख ७८ हजार १२४ जण कोरोनामुक्त झाले तर कोरोनामुळे १ लाख ३२ हजार ७२६ जणांचा मृत्यू झाला. देशात अद्याप ४ लाख ३९ हजार ७४७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट (कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर) ९३.६७ टक्के आणि डेथ रेट (कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर) १.४७ टक्के आहे. कोरोना अॅक्टिव्ह केस रेट ४.८६ टक्के आहे. आतापर्यंत भारतात १३ कोटी ६ लाख ५७ हजार ८०८ नमुन्यांची कोरोना चाचणी झाली. (India's corona recovery rate is 93.67 percent)
भारतात कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी लस (VACCINE) विकसित करण्यासाठी संशोधन प्रगतीपथावर आहे. पुढल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत भारतीयांना कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोणती लस नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती आयसीएमआरने अधिकृत वेबपेजवर प्रसिद्ध केली आहे. या वेबपेजवरील माहिती सामान्य नागरिक वाचू शकतात. (संदर्भ - https://vaccine.icmr.org.in/covid-19-vaccine)
भारत बायोटेक (Bharat Biotech), आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR) आणि एनआयव्ही (National Institute of Virology - NIV) संयुक्तपणे कोव्हॅक्सिन (COVAXIN) या लशीवर संशोधन करत आहे. या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. क्लिनिकल ट्रायल २६ हजार स्वयंसेवकांच्या नोंदणीच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टप्प्याटप्प्याने स्वयंसेवकांना लस दिली जात आहे.
पुण्याची सीरम इन्स्टिट्युट (Serum Institute of India - SII) कोविडशिल्ड (Covishield) या लशीचे संशोधन करत आहे. त्यांना चाचण्यांसाठी आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR) सहकार्य करत आहे. या लशीचे दुसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे.
झायडस कॅडिला (Zydus Cadila) ही कंपनी झायकोविड (ZyCoV-D) या लशीचे संशोधन करत आहे. या लशीचे दुसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे.
डॉ. रेड्डी लॅब (Dr Reddys Laboratories Limited) आणि स्पुटनिक (Sputnik LLC) या दोन कंपन्या एकत्र येऊन स्पुटनिक (Sputinik) या लशीचे संशोधन करत आहे. या लशीचे दुसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे.